मुंबई: दुचाहकीवर स्टंटबाजी करून प्रसारमध्यमांवर चित्रफीत टाकणाऱ्या चार तरुणांना कुर्ला पोलिसांनी अटक केली. स्टंटबाजीसाठी वापरलेली एक दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सध्या समाजमाध्यमांवर चित्रफिती टाकून अनेक जण प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुर्ला परिसरात अशाच प्रकारे २० ते २२ वयोगटातील काही तरुण रात्री येथील रस्त्यांवर स्टंटबाजी करीत होते. भरधाव वेगात दुचाकी चालवून हे तरुण स्टंटबाजी करीत होते. या स्टंटबाजीची चित्रफीत ते समाजमाध्यमावर टाकत होते. मात्र त्यांच्या स्टंटबाजीमुळे इतर वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला होता.

याबाबत काही वाहन चालकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. तसेच समाजमाध्यमावरही याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. पोलिसांनी तत्काळ याची दाखल घेत या तरुणांचा शोध सुरू केला. हे तरुण कुर्ला पश्चिम परिसरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांना तपासादरम्यान आढळले.

पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या आदित्य वाघ (२१), तनुष पवार (२०), संजय नाथ (१९) आणि अमन खान (१९) या चौघांना अटक केली. स्टंटबाजीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली.