मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे पुन्हा मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. विधि शाखेच्या तीन वर्षीय आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्र परीक्षेच्या (एटीकेटी) ‘लॉ ऑफ क्राईम्स’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न आढळून आल्यामुळे नवीन प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सततच्या चुकांनंतर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून विद्यार्थी संघटनांकडून टीकेचे ताशेरे ओढले जात आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या तीन वर्षीय आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राअंतर्गत ‘लॉ ऑफ क्राईम्स’ विषयाची (एटीकेटी) परीक्षा बुधवार, ७ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत नियोजित होती. मात्र सदर विषयाच्या प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न चुकीचे म्हणजेच ‘भारतीय न्याय संहिता’ अभ्यासक्रमानुसार आल्याचे ११ वाजता निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ नवीन प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि अर्धा तास वेळ वाढवून परीक्षेची वेळ १.३० वाजेपर्यंत करण्यात आली, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

‘मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून गोंधळाची मालिका सुरूच आहे. त्यामुळे नैतिकतेची जबाबदारी घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे.

विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्यांदा चुकीची प्रश्नपत्रिका

मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या तृतीय वर्ष पाचव्या सत्र परीक्षेत (एटीकेटी) विद्यार्थ्यांना मंगळवार, ८ एप्रिल रोजी ‘कामगार कायदे आणि औद्योगिक संबंध – २’ या विषयाची जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर चेंबूर येथील एका महाविद्यालयात विधि शाखेच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या सहाव्या आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या दहाव्या सत्र परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी ‘भारतीय साक्ष अधिनियम’ विषयाचा अभ्यास केला होता, मात्र संबंधित महाविद्यालयाच्या घोळामुळे विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे ‘भारतीय साक्ष पुरावा’ विषयाची प्रश्नपत्रिका सोडवावी लागली होती. ही गोंधळाची मालिका सुरू असताना मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या तीन वर्षीय आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्र परीक्षेच्या (एटीकेटी) ‘लॉ ऑफ क्राईम्स’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न आढळून आल्यामुळे नवीन प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला.