वादग्रस्त पार्श्वभूमी असतानाही मंत्रीपदे

डॉ. विजयकुमार गावित यांच्या समावेशावरून भाजपचा दुटप्पीपणा समोर आला.

वादग्रस्त पार्श्वभूमी असतानाही मंत्रीपदे
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना वादग्रस्त पार्श्वभूमी किंवा गैरव्यवहारांचे आरोप झालेल्या तिघांचा समावेश केल्याने सरकारच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.  डॉ. विजयकुमार गावित यांच्या समावेशावरून भाजपचा दुटप्पीपणा समोर आला. भाजपचे डॉ. विजयकुमार गावित आणि शिंदे गटातील संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या तिघांवर गंभीर स्वरूपांचे आरोप झाले आहेत. यापैकी डॉ. गावित यांच्यावर न्या. पी. बी. सावंत चौकशी आयोगाने ठपका ठेवला होता. भाजपने डॉ. गावित यांच्या विरोधात २००३ मध्ये वातावरण तापविले होते. त्याच भाजपने गावित यांना मंत्रीपद देऊन तेव्हा केलेल्या आरोपांवर पाणी सोडले.

डॉ. विजयकुमार गावित : राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजतेनील अनुदान  लाटण्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरेश जैन, डॉ. पद्मसिंह पाटील, नवाब मलिक आणि डॉ. गावित या राष्ट्रवादीच्या चार मंत्र्यांच्या विरोधात आरोप केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या मंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करण्याकरिता न्या. पी. बी. सावंत यांची नियुक्ती केली होती. न्या. सावंत आयोगाने चौकशीअंती चारही मंत्र्यांवर ठपका ठेवला होता. त्यापैकी जैन, मलिक आणि डॉ. पाटील यांनी मंत्रीपदाचे राजीनामे दिले होते. गावित यांनी अनुदानाची रक्कम लाटण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता; पण राष्ट्रवादीने डॉ. गावित यांना अभय दिले होते. भाजपने तेव्हा डॉ. गावित यांच्या हकालपट्टीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. पुढे २०१४ मध्ये नंदुरबार लोकसभेची जागा जिंकण्याकरिता भाजपने गावित यांच्या कन्येला उमेदवारी दिली. कालांतराने डॉ. गावित हे भाजपमध्ये दाखल झाले. आता भाजपने त्यांना मंत्रीपदाची संधी दिली आहे.

संजय राठोड : युवतीच्या आत्महत्येप्रकरणी राठोड यांच्यावर आरोप झाले होते. या युवतीने आत्महत्येपूर्वी राठोड यांच्या निकटवर्तीयांबरोबर केलेल्या संभाषणात सातत्याने संजय राठोड यांचा उल्लेख केला होता. या युवतीची ध्वनिफीत समाजमाध्यमांमध्ये प्रसारित होताच त्यावरून  गदारोळ झाला होता. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचा पिच्छा पुरविला होता. सरकारच्या प्रतिमेवर होणारा परिणाम आणि भाजपकडून सातत्याने केला जाणाऱ्या आरोपांमुळे राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. पुढे तरुणीच्या कुटुंबीयांनी राठोड यांच्याबाबत पोलिसांना दिलेल्या जबाबातून आत्महत्येस ते जबाबदार नसल्याचे कारण देत पोलिसांनी राठोड यांना निर्दोषत्व बहाल केले. मात्र राठोड व सरकारच्या दबावामुळे पोलिसांनी राठोड यांच्याविरोधात कारवाई केली नसल्याचे आणि कुटुंबीयांनी योग्य जबाब दिले नसल्याचे आरोप भाजप नेत्यांनी केले आणि उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. हेच राठोड आता मंत्री म्हणून भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत.

तानाजी सावंत : ‘तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकडय़ांनी पोखरल्याने फुटले’ हे विधान होते तत्कालीन जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांचे. कोकणातील तिवरे धरण फुटल्यावर ठेकेदार व संबंधितांच्या विरोधात कारवाईची मागणी होताच सावंत यांनी असे हे वादग्रस्त विधान केले होते.

अब्दुल सत्तार :  काँग्रेस, शिवसेना असा पक्षांतराचा प्रवास करून आता शिवसेनेच्या दुसऱ्या गटासोबत गेलेले अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्यापूर्वी एक दिवस आधी त्यांचे नाव गाजले ते शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळय़ामधील अपात्र ठरवलेल्या उमेदवारांच्या यादीत तीन अपत्यांचे नाव समोर आल्याच्या प्रकरणातून. टीईटी घोटाळा प्रकरण हे राज्यभर गाजलेले. कोटय़वधींचा भ्रष्टाचाराशी संबंधित हे प्रकरण आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
प्रतिनिधित्व नसल्याने महिला नेत्यांची नाराजी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी