मुंबई : गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीतून ३० ऑक्टोबर रोजी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. यापूर्वी हाच बिबट्या दोन वेळा जेरबंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. अंदाजे चार वर्षांच्या या बिबट्याला यापूर्वी ठाण्यातील येऊर जंगलातून आणि त्यानंतर बिंबीसार नगर येथील एका शाळेतील स्वच्छतागृहातून जेरबंद करण्यात आले होते. मात्र दीड वर्षांच्या मुलीचा बळी घेणारा बिबट्या हा नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अजब ! वातानुकूलित लोकल दाखल करा….लोकलमधून पडून होणारे प्रवाशांचे अपघात रोखण्यासाठी लोहमार्ग पोलिसांची रेल्वेकडे मागणी

आरे जंगलात बिबट्याचा वावर असून त्यांच्याकडून मानवी हल्ले होत आहेत. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युनिट क्रमांक १५ येथील दीड वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात तिचा बळी गेला. या घटनेनंतर संतप्त स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार वन विभागाने  पिंजरे आणि सीसी टीव्ही कॅमेरे बसवून २६ ऑक्टोबर रोजी एका बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. हे दोन्ही बिबटे सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत. या बिबट्यांवर उपचार करणारे डॉक्टर आणि अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ३० ऑक्टोबर रोजी पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या यापूर्वी दोन वेळा जेरबंद झाला होता.

हेही वाचा >>> पुढल वर्षी वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या युवकांना आताच मतदारयादीत नाव नोंदणी करता येणार

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. पहिल्यांदा या बिबट्याला येऊर जंगलातून जेरबंद करण्यात आले होते. अशक्तपणा आल्याने हा बिबट्या जंगलात निपचित पडल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्याला वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले होते. उपचारानंतर ठणठणीत झालेल्या या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पुढे गोरेगाव बिंबीसार नगरमध्ये हा बिबट्या शिरला आणि येथील एका शाळेच्या स्वच्छतागृहात अडकला. अखेर त्याला बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले होते. आता हाच बिबट्या ३० ऑक्टोबर रोजी तिसऱ्यांदा वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard captured in mumbai s aarey colony leopard caught in aarey colony mumbai print news zws