मुंबई: महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा विभागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांनी आर्थिक मदत करण्याचे ठरवले आहे. अभियंत्यांनी आपले एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ साठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टीमुळे मराठवाडामध्ये अभूतपूर्व पूरपरिस्थिती उद्भवली आहे. अशीच परिस्थिती विदर्भ, नाशिक, सोलापूरसारख्या भागामध्येदेखील निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, नागरिकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरे, संसार, शेती सगळं काही डोळ्यासमोर वाहून गेलं आहे. पूराच्या पाण्यात सारेकाही वाहून गेल्यामुळे या भागातील अनेक कुटुंबांची दसरा दिवाळी होऊ शकणार नाही. महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय महानगर पालिकेतील अभियंत्यांनी घेतला आहे.

म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर यांनी म्हटले आहे की, अभियंत्यांनी आजवर जपलेल्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून महानगर पालिकेतील अभियंते आपला एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ साठी देऊ इच्छितात. तरी, बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंत्यांचे चालू महिन्याच्या वेतनातून एक दिवसाच्या वेतनाची जमा झालेली रक्कम ‘मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये’ वर्ग करण्याबाबत कार्यवाही करावी अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, सोलापूरसह मराठवाड्यातील भयावह पूरस्थितीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, पिके आणि पशूधनाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.