मुंबई : वायव्य मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पातील अनेक रहिवाशांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात तपासणी केली तेव्हा नावे होती. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदार यादीत नावे नसल्याची तक्रार अनेकजण करीत होते.

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पुनर्विकास प्रकल्पाची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक रहिवासी अन्यत्र राहावयास गेले आहेत. आपली नावे असतील, असे गृहित धरून यापैकी अनेकजण मतदानासाठी आले तेव्हा यादीत नावे नसल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क न बजावता परत जावे लागले. काही काळ त्यांनी मतदान अधिकाऱ्यांकडे विचारणाही केली. परंतु आता काहीही करता येणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले.

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 : उत्साहाला घोळाच्या झळा! संथ मतदान प्रक्रियेमुळे केंद्रांवर लांबच लांब रांगा; मतदार संतप्त

जानेवारी २०२४ मध्ये अंतिम मतदार यादी निश्चित केल्यानंतरही एप्रिल अखेरपर्यंत आपले नाव आहे किंवा नाही याची तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मूळ यादीनुसार प्रत्यक्ष छाननी करून मसुदा यादीही जाहीर करण्यात आली होती. त्यातही काही आपले नाव आहे का? नसल्यास पुनर्नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर मतदार यादी निश्चित करण्यात आली. यंदा वायव्य मुंबईत २७ हजारांनी मतदारांमध्ये वाढ झाली, असे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. मतदार यादीत छायाचित्रे नसल्याने अनेकांची नावे वगळण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

मतदान संथगतीने…

वायव्य मुंबईत अनेक मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा होत्या. मात्र प्रचंड उकाडा आणि मतदान केंद्रात पंख्याची कमतरता तसेच रांगेत एक पुरुष आणि एक महिला यांना मतदानासाठी सोडले जात असल्याने किमान एक तास उभे राहिल्यावर मतदान करावे लागत असल्याने मतदार त्रस्त झाले होते. मतदान संथगतीने होत असल्यामुळे रांगा वाढत होत्या आणि निवडणूक आयोगाने सांगूनही मंडपाची व्यवस्था नसल्याने उन्हात उभे राहावे लागत होते. मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास मनाई असतानाही मतदारांना आणलेले मोबाइल पोलीस जमा करुन घेत होते तर काही मतदान केंद्रात अशी तपासणीच केली जात नव्हती.