मुंबई : कुठल्याही दोन व्यक्तींमधला पत्रसंवाद हा त्यांच्या विचारांचे, व्यक्तिमत्त्वाचे, संस्कृतीचे, संस्कारांचे, आवडीनिवडींचे, भावभावनांचे त्या त्या काळाच्या कोंदणातून उमटलेले प्रतिबिंब म्हणता येईल. शब्दसंवादाचा हा सेतू जर दोन प्रतिभावंत लेखकांमधील असेल तर तो अनेकार्थाने महत्तम दस्तावेज ठरतो. मराठी सारस्वतांमधील अग्रणी जी. ए. कुलकर्णी आणि विदुषी सुनीताबाई देशपांडे यांच्यातील पत्रसंवाद हा असाच मौलिक खजिना. या दोघांमधील पत्रसंवाद भव्य अशा नाट्यरूपात अनुभवण्याची पर्वणी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या माध्यमातून मिळणार आहे.

मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या अभिनव कार्यक्रमांतर्गत अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. येत्या ३० ऑक्टोबरपासून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर (पान ४ वर) (पान १ वरून) प्रांगण, कल्याण येथील आचार्य अत्रे सभागृह, पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. अभिजात साहित्य, कलासंस्कृतीचा नव्या जाणीवनेणिवेतून वेध घेत सादर होणारे विशेष प्रयोग हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. मराठी-हिंदी चित्रपटातून गाजलेले अभिनेते, लेखक, निर्माते गिरीश कुलकर्णी आणि ख्यातनाम लेखिका माधुरी पुरंदरे पहिल्यांदाच एकत्र येऊन सादर करत असलेला जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई देशपांडे यांच्यातील पत्रसंवादाचा रंगमंचीय आविष्कार हा असाच अभिनव प्रयोग म्हणता येईल.

सुनीताबाई देशपांडे आणि जी. ए. कुलकर्णी या दोन प्रतिभावान सारस्वतांमधील मैत्र त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रातून रसिकांसमोर उलगडले. या दोन भिन्न प्रकृतीच्या, विचारांच्या आणि तरीही दृढ मैत्रीच्या नात्याने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या साहित्यिकांमधील पत्रव्यवहार ‘प्रिय जी. ए.’ या नावाने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याचे अभिवाचनाचे प्रयोगही रंगले. मात्र, हा पत्रसंवाद भव्यदिव्य अशा नाटकाच्या रूपात पहिल्यांदाच रंगभूमीवर येणार आहे. या अभिनव ‘पत्र’नाट्याचा विशेष प्रयोग पहिल्यांदाच गिरीश कुलकर्णी आणि माधुरी पुरंदरे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर सादर करणार आहेत. सुनीताबाई आणि जी.एं.मधला पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेला संवाद आजही अनेक रसिकांच्या मनात रुंजी घालतो. आता अभिवाचनाच्या मर्यादित स्वरूपापलीकडे जाणारे त्याचे नाट्य सादरीकरण कसे असेल, हे अनुभवण्यासाठी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये होणारा हा प्रयोग पाहायला हवा. या विशेष प्रयोगासह असे अनेक स्वरचित विशेष प्रयोग आणि कार्यक्रमांची वेळ, स्थळ, दिवस, मोफत प्रवेशिका, नावनोंदणी आदी तपशील येत्या काही दिवसांत ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातील.

● मुख्य प्रायोजक : सारस्वत कोऑप बँक लिमिटेड

● सहप्रायोजक : केसरी टूर्स

● पॉवर्ड बाय पार्टनर : कौटिल्य मल्टिक्रिएशन

सादरकर्ते : गिरीश कुलकर्णी, माधुरी पुरंदरे