मुंबई : जिल्ह्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाची शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद करून त्याआधारे बनवण्यात आलेल्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचे आज, गुरुवारी (दि. १५ फेब्रु.) मुंबईत प्रकाशन होणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन उपस्थित राहणार आहेत. जिल्हा निर्देशांकात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा या वेळी सन्मान केला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बँका, रस्त्यांच्या जाळ्यामुळे रत्नागिरी विकासाच्या वाटेवर

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’चे मुख्य प्रायोजक असून ‘पॉवर्ड बाय पार्टनर’ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि शहरे व औद्याोगिक महामंडळ (सिडको) आहेत. ‘नॉलेज पार्टनर’ गोखले इन्स्टिट्यूट, पुणे आहेत. सामाजिक, आर्थिक, पायाभूत सुविधा तसेच आरोग्य, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था, औद्याोगिक स्थिती, वीजपुरवठा अशा विविध निकषांच्या आधारे सांख्यिकीची मांडणी करून त्याआधारे जिल्ह्यांच्या कामगिरीचा पट ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालातून मांडण्यात येतो. यंदा या अहवालाचे दुसरे वर्ष आहे. विकासाच्या मापदंडांवर अतिप्रगत किंवा कमी विकसित जिल्ह्यांना एकाच तराजूत न तोलता त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील सर्वोत्तम जिल्ह्याचा ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ सोहळ्यात सन्मान करण्यात येणार असून विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांनाही गौरवण्यात येणार आहे. याशिवाय काही विशिष्ट विकास निकषांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांनाही यंदाच्या वर्षीपासून सन्मानित केले जाणार आहे.

जिल्ह्यांच्या विकासाचा निर्देशांक उलगडून सांगणाऱ्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचे प्रकाशन अनंत नागेश्वरन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमादरम्यान नागेश्वरन हे ‘विकासाच्या प्रवाहातील जिल्ह्यांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करतील तर फडणवीस हेदेखील उपस्थितांना संबोधित करतील. ‘गोखले इन्स्टिट्यूट’चे अजित रानडे ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ निर्मितीची नेमकी प्रक्रिया विशद करतील. कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रशासकीय, राजकीय क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता जिल्हा निर्देशांकअहवालाचा प्रकाशन सोहळा आज, गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta district index report release in presence of dcm devendra fadnavis zws
First published on: 15-02-2024 at 03:14 IST