मुंबई : साहित्यिक आणि वैचारिक अंकांच्या फराळगर्दीतही ‘लोकसत्ता’चा दिवाळी अंक वाचकांच्या पसंतीस उतरणारा. सकस, दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण साहित्याची आरास हे वैशिष्टय़ जपत यंदाही सामाजिक जाणिवा विस्तारणारे वैचारिक, उद्बोधक आणि मनोरंजक लेखन अंकाचा भाग बनले असून नजीकच्या विक्रेत्याकडून अथवा ग्रंथदालनांतून आजच आपली प्रत ताब्यात घ्या.

वृत्तपत्रीय दिवाळी अंकांच्या साहित्यिक जबाबदारीत वाचकांना घडविणारे आणि त्यांना आपल्या भवतालाशी जोडून देणारे अंक फारच कमी. ‘लोकसत्ता’ मात्र गेली कित्येक दशके दिवाळी अंकाच्या माध्यमातून विशेष लेखमाला, रिपोर्ताज, कथनात्मक तसेच अकथनात्मक साहित्याद्वारे वाचकांना इतिहासाचे भान आणि वर्तमानाची जाणीव करून देण्याचा आग्रह धरतो. साहित्य-कला-संस्कृती-चित्रपट आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर लेखकांची फौज यातून वाचायला मिळते.

विक्रांत भिसे यांच्या ‘सम्यक दृष्टीची मूर्तरूपे’ या चित्रमालिकेतील कबीराच्या चित्राने यंदाच्या अंकाचे मुखपृष्ठ सजलेय. विचारप्रवर्तनाची कास धरणाऱ्या या चित्राची भाषा अभिजीत ताम्हणे यांनी स्पष्ट केली आहे. व्यंगचित्रमालिका, नीरजा, दासू वैद्य, प्रदीप कोकरे, मेधा पाटकर, कल्पना दुधाळ, योगिनी सातारकर पांडे, रेणुका खोत, अक्षय शिंपी आदी दोन पिढीच्या कवींचा पद्यविभाग आणि वार्षिक भविष्यासह समृद्ध करणाऱ्या मजकुराची चंगळ यंदाही वाचकांना अनुभवायला मिळेल.

रिपोर्ताज आणि लेख..

जर्मनीमध्ये एक व्यंगचित्र मासिक काही दशके देशी आणि विदेशी मान्यवरांच्या टोप्या उडविते. ‘टायटॅनिक’ नावाच्या या मासिकाचा दबदबा विनोदाच्या नावाने कुठलीही पातळी वापरूनही लोकांना ते हवेहवेसे का वाटते, याचा तपशिलात आढावा व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी अंकात घेतलाय. देशातल्या हातमाग विणकर कोणत्या स्थितीतून जातोय याचा शोध रिपोर्ताज अवंती कुलकर्णी यांनी लिहिला असून तिबेटचे शोधयात्री नैनसिंग रावत यांनी अवघड भागातील नकाशा निर्मितीचा शतकाप्रू्वीचा आलेख डॉ. अनुराग लव्हेकर यांनी काढलाय. जपानच्या दोन शहरांत अणुबॉम्ब पडला त्याआधीची कारणमीमांसा लोकेश शेवडे यांच्या लेखातून कळते तर आपल्या सगळय़ांच्याच ‘इव्हेंट’पूर्ण जगण्याचे विवेचन विनय सहस्रबुद्धे यांनी केले आहे.

विशेष विभाग..

शताब्दीपूर्ती साजरी करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर असलेल्या आव्हानांवर सुधींद्र कुलकर्णी यांनी लिहिलेला ‘भागवत, भारतीय मुस्लीम आणि पुनर्कल्पित अखंड भारत’ हा चर्चालेख अभ्यासक तसेच वैचारिक वाचकांची तहान-भूक भागवणारा. स्कॉटलंडमधील एिडबरा या उत्सवाच्या डोंगरगावाचे प्रवासचित्र ‘लोकसत्ता’चे संपादक ‘गिरीश कुबेर’ यांनी रेखाटले असून श्याम मनोहर, निखिलेश चित्रे यांच्या स्वतंत्र कथा, गौरहरी दास यांची आसाराम लोमटे यांनी अनुवादित केलेली गोष्ट आणि हायकू या जपानी काव्यप्रकाराच्या निमित्ताने विजय पाडळकर यांचे आत्मकथन असा वैविध्यपूर्ण वाचनपसारा अनुभवायला मिळेल.

खास आकर्षण..

’‘एआय’ म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आपल्या रोजच्या जगण्यात वेगवेगळय़ा माध्यमांतून शिरलाय. दिवसभर दरघरटी पाहिल्या जाणाऱ्या शेकडो रिल्सपासून ते युद्धात, आरोग्य क्षेत्रात, माध्यमांत, संगीता-सिनेमांत त्यांचा अंतर्भाव झाल्यामुळे भविष्यात ही क्षेत्रे अंतर्बाह्य बदलणार.

’वैद्यकीय सेवेत डॉक्टरला एआय पर्याय ठरेल? सिनेमा आणि संगीत क्षेत्रात अभूतपूर्व बेकारी येईल? माध्यम क्षेत्रांसह सगळय़ाच क्षेत्रांचे काय होईल याचा वेध पंकज फणसे, अमोल उदगीरकर, डॉ. केशवचैतन्य कुंटे, जतिन गांधी, डॉ. श्रीराम गीत- चिन्मय गवाणकर, विनीत राजीव शर्मा यांनी घेतलाय.

‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून विशेष लेखमाला, रिपोर्ताज तसेच साहित्याद्वारे वाचकांना इतिहासाचे भान आणि वर्तमानाची जाणीव करून देण्याचा आग्रह आहे..