मुंबई : कालानुरूप बदलत गेलेल्या भवतालात आपल्याला जाणवणाऱ्या संवेदना, सलणारे विषय, विचारमंथनास उद्याुक्त करणारे विषय देखण्या, नेटक्या रूपबंधासह मांडलेल्या नाट्यप्रयोगातून रसिकमनांपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुण रंगकर्मी आसुसलेले असतात. नाट्यानुभवातून व्यक्त होण्याची तरुण रंगकर्मींची ही निकड, त्यांची सळसळती ऊर्जा आणि त्यांच्या प्रयोगशीलतेला मंच उपलब्ध करून देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ची प्रयोगशाळा पुन्हा एकदा गजबजणार आहे.
दशकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेने गेल्या काही वर्षांत नाट्यवर्तुळात विश्वास आणि प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले आहे. राज्यभरातील उदयोन्मुख रंगकर्मींना महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून स्वत:ला अजमावून पाहण्याची संधी देण्याबरोबरच कलाक्षेत्रातील विविध कवाडे ‘लोकसत्ता लोकांकिका’ने खुली करून दिली.
आजवर पूर्ण लांबीच्या नाटकाचे लघुरूप म्हणून ओळखल्या गेलेल्या एकांकिकांनी आता स्वतंत्र नाट्यप्रकार म्हणून स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले आहे. एकीकडे जिवंत नाट्याभिनयाची पर्वणी आणि नवनव्या आशयातून मिळणारे विचारखाद्या, मनोरंजन यांमुळे चित्रपटांपेक्षाही नाटकांना दर्दी रसिकांची पसंती मिळत आहे. अगदी प्रथितयश कलाकारही पुन्हा रंगभूमीवर रमलेले पाहायला मिळत आहेत. याच उत्फुल्ल वातावरणाचे प्रतिबिंब एकांकिका स्पर्धांवर न पडते तरच नवल. एकांकिकांच्या माध्यमातून रंगमंचावर आलेल्या, लक्ष वेधून घेणाऱ्या कथा, नवे प्रयोग पुढे व्यावसायिक नाटक स्वरूपात उभे राहात आहेत. एकांकिकांची हीच ताकद ओळखून ‘लोकसत्ता’ने महाविद्यालयीन रंगकर्मींना ‘लोकांकिका’चा सशक्त प्रयोगमंच उपलब्ध करून दिला. हा यशस्वी लौकिक कायम राखत पुन्हा एकदा ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या नव्या पर्वाला दिमाखात सुरुवात होत आहे.
प्रवेशिका लवकरच
गेल्या नऊ वर्षांच्या वाटचालीत अनेक महाविद्यालयीन कलाकार ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या माध्यमातून सर्जनशील लेखक, दिग्दर्शक, कलाकार, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार, संगीतकार म्हणून कलाक्षेत्रात नावारूपाला आले आहेत. हा यशस्वी लौकिक कायम राखत ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची घोडदौड त्याच वेगाने सुरू राहणार असून स्पर्धेच्या प्रवेशिका लवकरच उपलब्ध होणार आहेत.
● मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
● सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
● साहाय्य : अस्तित्व
● टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन