मुंबई : वाराणसीच्या गंगा आरतीच्या धर्तीवर यंदाही मुंबईतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या काठावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५ नोव्हेंबरला महाआरती होणार आहे. दक्षिण मुंबईत होत असलेल्या वाहतूक नियंत्रणाच्या अडचणीमुळे या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र स्थानिक आमदार,मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आता पोलीस प्रशासनाने येत्या ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या आरतीला परवानगी दिली आहे.
दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा या तलावाला धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या व पुरातन वास्तू म्हणूनही खूप महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांपासून या तलावाच्या काठावर त्रिपुरारी पोर्णिमेला हजारो दिवे लावून महाआरती केली जाते. यंदा मात्र या महाआरतीला परवानगी नाकारण्यात आली होती. बाणगंगावर होणाऱ्या महाआरतीला मुंबईकरांसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे गर्दी वाढते, असे कारण देत वाहतूक पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
जीएसबी ट्रस्टच्या वतीने या महाआरतीचे आयोजन केले जाते. यंदा परवानगी नाकारल्याचे पत्र ३ ऑक्टोबर रोजी ट्रस्टला देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्री लोढा यांनी जनतेच्या भावनांचा आदर करून प्रशासनाने आरती कार्यक्रमात उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले. धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक जमा होत असले तरी प्रशासन जनतेच्या भावनांचा अनादर करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
वाहतूक कोंडीचा तिढा सुटला असून यासंदर्भात पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांच्यासह बाणगंगा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्तांसह ट्रस्टचे अन्य पदाधिकारी आणि स्थानिक निवासी यांच्या बैठकीनंतर आरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बाणगंगा तलावावरील ही महाआरती वर्षातून एकदाच होते. या महाआरतीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या आरतीमध्ये हजारो दिवे लावले जातात आणि हा विधी वाराणसीच्या गंगा आरतीसारखा अतिशय भव्य असतो.
बाणगंगा तलावाच्या उत्पत्तीचा संबंध थेट रामायण काळाशी जोडलेला आहे. अकराव्या शतकाच्या पौराणिक संदर्भामध्ये या तलावाच्या पाऊलखूणा आढतात. प्रभू श्रीराम या परिसरात आले असता त्यांनी या परिसरात वाळूपासून शिवलिंग तयार केले व त्याची पूजा केली असे सांगितले जाते. तसेच चारही बाजून समुद्राने वेढलेल्या या परिसरात रामाने बाण मारून गोड्या पाण्याचा झरा इथे निर्माण केला त्यामुळे या तलावाला बाणगंगा म्हणतात, अशीही दंतकथा आहे.
तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदीर, सिद्धेश्वर शंकर मंदीर, बजरंग आखाडा व वाळकेश्वर मंदीर इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. या परिसराला धार्मिक महत्त्व असल्यामुळे येथे विविध धार्मिक विधी, पितृपक्षाचे विधी, श्राद्ध या विधींसाठी भाविकांची गर्दी होत असते. तलाव परिसरात असंख्य मंदीरे असून त्याची देखभाल गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टतर्फे केली जाते.
