तावडे, बावनकुळे, खडसे, मेहतांना उमेदवारी नाकारली; बंडखोरांना मुख्यमंत्र्यांची समज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमधील बडय़ा नेत्यांच्या उमेदवारीवरून चाललेल्या नाटय़ावर शुक्रवारी पडदा पडला. विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या विद्यमान तसेच एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता या माजी मंत्र्यांना उमेदवारी नाकारून भाजपने धक्का दिला. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राज्यात सर्वत्रच मोठय़ा प्रमाणावर बंडखोरीचे चित्र होते. या पाश्र्वभूमीवर बंडखोरांनी दोन दिवसांत माघार घ्यावी, अन्यथा त्यांना निवडणुकीत पराभूत करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या औपचारिक घोषणेसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भाजप आणि शिवसेना तिन्ही मतदारसंघांमध्ये परस्परांच्या विरोधात लढत असून, जिल्ह्य़ात युती संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मेव्हणे, शिवसेना खासदार लोखंडे यांचे पूत्र आदींनी बंडखोरी केली आहे.

उमेदवारांची नावे निश्चित करताना भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला. विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोन विद्यमान मंत्र्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. जमीन घोटाळ्यात आरोप झाल्यावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या एकनाथ खडसे आणि विकासकांचा फायदा होईल अशा पद्धतीने निर्णय घेतल्याने मंत्रिपद गमवाव्या लागलेल्या प्रकाश मेहता या दोन माजी मंत्र्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. पाच ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारून मनमानी चालणार नाही, असा संदेश पक्षाने दिला आहे. खडसे यांना उमेदवारी नाकारण्यात आली असली तरी त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन खडसे बंडखोरी करणार नाहीत याची खबरदारी पक्षाने घेतली.

उमेदवारी नाकारण्यात आल्यावर पक्ष चुकला की मी स्वत: चुकलो याचा विचार निवडणुकीनंतर करावा लागेल, असे विधान करणाऱ्या विनोद तावडे यांना आपली नाराजी लपविता आली नाही. ऊर्जामंत्री बावनकुळे यांना उमेदवारी नाकारून भाजपने त्यांना मोठा धक्का दिला आहे. उमेदवारीसाठी बावनकुळे हे दुपापर्यंत वाट बघत होते. आपल्याला उमेदवारी मिळत नाही हे लक्षात येताच  बावनकुळे यांनी पत्नीचा अर्ज दाखल केला. पण पक्षाने दुपारी दोन नंतर दुसऱ्याच उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. बावनकुळे यांच्या विरोधात दिल्लीत तक्रारी गेल्या होत्या. यातूनच त्यांना उमेदवारी न दिली गेल्याचे सांगण्यात आले.

उमेदवारी नाकारण्यात आल्याने माजी मंत्री प्रकाश मेहता यांना अश्रू आवरता आले नाहीत. नाराज मेहता यांच्या समर्थकांनी भाजपने उमेदवारी दिलेल्या पराग शहा यांच्या गाडीची काच फोडली आणि त्यांच्या अंगरक्षकाला बेदम मारहाण केली. मेहता समर्थकांच्या या कृतीमुळे भाजपची पार पंचाईत झाली.

सर्वत्रच बंडखोरी

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी झाली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या साऱ्याच पक्षांना बंडखोरीची झळ बसली आहे. पुण्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीत परस्परांच्या विरोधात अर्ज दाखल केले गेले.

कोल्हापूर जिल्ह्य़ात दहापैकी आठ जागा शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने भाजपमधील नाराजांनी जनसूराज्य आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केले. सोलापूर जिल्ह्य़ातही बंडखोरी झाली आहे. करमाळ्यातून रश्मी बागल यांना उमेदवारी देण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या विद्यमान आमदाराने बंड केले. बार्शीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिलीप सोपल यांच्या विरोधात माजी आमदाराने अपक्ष अर्ज दाखल केला आहे. सोलापूर शहरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अधिकृतपणे उमेदवार उभा केला आहे. अक्कलकोट, मोहोळ मतदारसंघांमध्येही बंडखोरी झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रातूनही नाराजी..

उत्तर महाराष्ट्रात बंडखोरांचे उदंड पीक आले आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात मनसेचे पदाधिकारी अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश करून मैदानात उडी घेतली. देवळाली मतदारसंघात भाजपच्या नगरसेविका सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादीचे तिकीट मिळवत सेनेला आव्हान दिले. नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या विरोधात सेनेच्या तीन नगरसेवकांनी अर्ज दाखल केले. भुसावळमध्ये तिकीट न दिल्याने संतापलेल्या संजय ब्राम्हणे यांनी काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष अर्ज भरला. रावेरमध्ये भाजपचे हरिभाऊ जावळे यांच्या विरोधात पदाधिकारी अनील चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये सेना-भाजपमधील वाद चव्हाटय़ावर आला आहे. सहकार राज्यमंत्री यांच्या विरोधात भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी केली. नंदुरबारमध्ये शरद गावित यांनी नवापूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराविरोधात अर्ज भरला.

विदर्भात भाजप आमदारही सरसावले..

यवतमाळ जिल्ह्य़ात आर्णी मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राजू तोडसाम तर उमरखेडचे भाजपचे विद्यमान आमदार  राजेंद्र नजरधने यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून अर्ज भरले. तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांनीही पक्षाविरुद्ध बंडखोरी केली आहे.  भंडारा जिल्ह्य़ात तिरोडय़ाचे माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भ्रष्टाचाराचे आरोप भोवले?

’ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे आदींना भाजपने उमेदवारी नाकारल्याच्या काही कारणांमागे गेल्या काही वर्षांत त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे एक महत्त्वाचे कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ’विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना तोंड देण्यासाठी पक्षाची प्रतिमा उजळविण्याचा हा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

’मात्र भाजपने उशिरा का होईना, भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई केली आणि जे नेते अजूनही निवडणूक िरगणात आहेत, त्यांना जनताच धडा शिकवेल, असे टीकास्त्र विरोधकांनी सोडले आहे.

मुख्यमंत्र्यांचा इशारा

मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पुढील दोन दिवसांमध्ये सर्व बंडखोरांनी माघार घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. सर्व बंडखोरांना विनंती करण्यात येणार आहे. तरीही बंडखोरी कायम ठेवल्यास त्यांचा युतीच्या उमेदवारांकडून पराभव केला जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

भाजपचे १६२ उमेदवार, तर सेनेला १२४ जागा

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप-शिवसेना महायुतीचे जागावाटप स्पष्ट झाले असून भाजपने १५२ जागांवर थेट उमेदवार जाहीर करताना रिपब्लिकन पक्ष, रासप, रयत क्रांती, शिवसंग्राम या मित्र पक्षांसाठी १२ जागा सोडल्या. शिवसेनेच्या वाटय़ाला १२४ जागा आल्या. विशेष म्हणजे सदा भाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या दोन जागांवर भाजपने आपल्याच नेत्यांना उमेदवारी दिली आहे. तर रासपने जिंतूर व दौंड या दोन मतदारसंघात आपल्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे १६२ उमेदवार कमळ या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.