मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि महापुरात नुकसान झालेल्या मत्स्य व्यवसायिकांना मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार मासेमारी बोटी, जाळ्या, मत्स्यबीज नुकसानीपोटी मदत देण्याचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.
अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत बाधित मत्स्य व्यवसायिकांना विशेष मदत आणि सवलती देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या निकषांत बसणारे नुकसान भरपाईचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार मासेमारी बोटींचे अंशतः दुरुस्तीसाठी प्रत्येकी सहा हजार रुपये. पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीसाठी प्रत्येकी पंधरा हजार रुपये.
अशंतः नुकसान झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी तीन हजार आणि पूर्णतः नुकसान झालेल्या जाळीसाठी चार हजार रुपये. मत्स्यबीज शेतीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
मदतीची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जाणार आहे. मदतीसाठी नुकसानीचा पंचनामा होण्याची गरज आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी संबंधित जिल्ह्याचा एकत्रित प्रस्ताव करून द्यावयाचा आहे.
