मुंबई : गतवर्षी बारदाणा अभावी सोयाबीन खरेदी प्रकियेत अडथळे आले होते. ऐन हंगामात खरेदी बंद करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. त्यामुळे यंदाच्या खरेदी हंगामात बारदाण्याचा पुरवठा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या मार्फत केला जाणार आहे. त्यामुळे बारदाणा खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.

किमान आधारभूत योजनेच्या अंतर्गत एकूण उत्पादनाच्या २५ टक्के सोयाबीन, हरभरा, उडीद, तूर आदीची हमीभावाने खरेदी केली जाते. नाफेड, एनसीसीएफ या नोडल एजन्सी म्हणून काम करतात. गतवर्षी जागतिक बाजारात सोयाबीनचे दर पडल्यामुळे सरकारला हमीभावाने सोयाबीन खरेदी करावी लागली. मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्यामुळे बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. ऐन खरेदी हंगाम जोमात असताना बारदाणा नसल्यामुळे खरेदी बंद पडल्यामुळे केंद्रांवर सोयाबीन उत्पादकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच वेळेत खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या मार्फत बारदाणा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे बारदाणा खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागाचे सह सचिव सदस्य, तर पणन संचालक, नाफेड, एनसीसीएफचे राज्य प्रतिनिधी निमंत्रित सदस्य म्हणून काम करतील. पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत.

खरेदी हंगामात बारदाणाचा तुटवडा निर्माण होऊ नये, अपेक्षित बारदाणा उपलब्ध असावा, यासाठी समिती निविदा काढून बारदाणा खरेदीची प्रक्रिया राबविणार आहे.

बारदाणा खरेदीत काळाबाजार?

हमीभावाने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बारदाणा लागतो. गतवर्षी सुमारे १ कोटी १२ लाख १३ हजार ८४९ क्विंटल सोयाबीन, मूग ५,८६६ क्विंटल, उडीद २५२३ क्विंटल आणि तूर १ कोटी ३३ लाख ३१ हजार २०० क्विंटल तूर खरेदी झाली होती. या सर्व खरेदीसाठी बारदाणा लागतो. सध्या ५० किलो क्षमतेचा बारदाणा असल्यामुळे मोठ्या संख्येने बारदाणा लागतो. अनेक भाताचा बारदाणा सोयाबीनसाठी वापरला जातो. जुना बारदाणा वापरून नव्या बारदाण्याचा खरेदी दर दाखवून गैरव्यवहार केला जातो.