मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प सोडला आहे. या धेयाच्या पूर्ततेसाठी ‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ या व्हिजन डॉक्युमेंटची निर्मिती करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांच्या सूचना, अपेक्षा, हरकती आणि प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी ‘नागरिक सर्वेक्षण’ केले जात आहे. या सर्वेक्षणात मुंबईकरांनी सहभागी होऊन अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला २०४७ साली १०० वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी विकसित भारताबरोबरच विकसित महाराष्ट्राचे चित्र कसे असेल, याचा भविष्यवेध घेणारे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ असे व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन तयार करीत आहे. हा राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा असेल. हा आराखडा तयार करताना सर्वसामान्यांच्या अपेक्षा व हरकती जाणून घेण्यासाठी नागिरक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणाव्दारे राहणीमानाचा दर्जा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि उपजीविकेच्या संधी या मुद्द्यांवर नागरिकांची मते नोंदवून घेतली जात आहेत. सर्वेक्षणासाठी https://wa.link/o93s9m या लिंकवर क्लिक करून तसेच, क्यूआर कोड स्कॅन करून किंवा व्हॉट्स ॲप चॅट-बॉटद्वारे नागरिकांना अभिप्राय नोंदवता येतील. या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित केली जाणार नाही. नागरिकांनी दिलेल्या सूचना गोपनीय ठेवल्या जातील आणि त्या ‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ च्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचारात घेतल्या जातील, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हे सर्वेक्षण आपल्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येकाच्या सहभागाने एक प्रगतिशील, शाश्वत आणि सर्वसमावेशक महाराष्ट्र घडवता येऊ शकतो. त्यामुळे, नागरिकांनी या सर्वेक्षणात सक्रियपणे सहभागी व्हावे आणि आपल्या संपर्कातील इतरांनाही यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.