मुंबई : थकीत महागाई भत्ता, वेतनवाढ फरकाची रक्कम व इतर थकीत देणी अशी मिळून कर्मचाऱ्यांची ४ हजार कोटी रुपयांची थकीत देणी व इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढणार आहेत.

एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयावर १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजता मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर तात्काळ एसटी कर्मचारी बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत.

एसटीच्या स्थापनेपासून कर्मचाऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. विविध मागण्यांसाठी ही आंदोलने करण्यात आली. त्यामुळे झोपलेल्या एसटी प्रशासनाला जागे करण्यात यावेळी आगळेवेगळे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची घोषणा ६ ऑक्टोबर रोजी दादर येथे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप करणार आहेत.

यावेळी एसटी कर्मचारी या आंदोलनासंदर्भातील सादरीकरण करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी राज्यातील विविध भागातून कर्मचारी येणार आहेत. एसटीच्या इतिहासात प्रथमच असे वेगळ्या प्रकारचे आंदोलन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.