राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यानंतर पावणेदोन वर्षांत राज्यात तब्बल ३३ कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याच कालावधीत उर्वरित देशभरात मिळून फक्त ७ कोटींचा गुटखा जप्त झाला असल्याच्या पाश्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची ही कारवाई उल्लेखनीय आहे.
राज्याने १९ जुलै २०१२ पासून गुटखा व पानमसाला आणि तत्सम पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मुंबई परिसरात गुटखा जप्त करण्याची धडक कारवाई सुरू केली. हा गुटखा कुठून येतो याची माहिती घेऊन राज्यातील विविध चेक नाके, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला. गुटख्याची चोरटी वाहतूक होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य दक्षता अधिकारी, तसेच राज्यातील विविध रेल्वे स्थानके आणि संबंधित पोलीस ठाणी यांना मोहिमेबाबत कळवण्यात आले.
जुलै २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकांच्या परिसरात धडक मोहीम राबवण्यात येऊन अन्य राज्यांतून रेल्वेने येणारा गुटखा व पानमसाला यांचा १ कोटी ७० लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. त्याहीनंतर, गुटखाबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत एकूण सुमारे ३३ कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गुटखा जप्त करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. देशाच्या उर्वरित भागात मिळून याच कालावधीत फक्त ७ कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra top in gutkha seized