मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात थंडीची चाहुल लागल्याचे संकेत या घसरणाऱ्या तापमानाच्या पाऱ्याने दिले आहेत. तर येत्या काही दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास वेळेवर झाला असला तरी अचानक आलेल्या पावसामुळे थंडीचे गणित बिघडवले. परिणामी, पावसाळ्यानंतरही नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. पावसाने उघडीप दिल्याने कोरडे वातावरण, निरभ्र आकाश यामुळे किमान तापमानात घट होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या पहाटेचा काहीसा गारवा अनुभवायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील. तर पुढील चार दिवस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ नोव्हेंबरनंतर संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात रात्री व पहाटेच्या हवेत गारवा जाणवत आहे. त्यामुळे गुलाबी थंडीची चाहुल लागली असली तरीही हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची मात्र प्रतीक्षाच आहे.

मुंबईतही पहाटे गारवा जाणवत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. काही भागात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या जवळ तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. त्यामुळे या ठिकाणी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पावसाची शक्यता नाही

राज्यात सध्या पावसाची शक्यता नाही. काही भागात ढगाळ वातावरण राहील. मात्र, पावसाची शक्यता फारशी नाही. ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात उकाडा जाणवेल.