मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसीत भारत २०४७’ या पथदर्शी कार्यक्रमास सुसंगत विकास आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी फडणवीस यांची ‘मेघदूत’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भेटीमध्ये सुब्रह्मण्यम यांनी संगणकीय सादरीकरणा द्वारे निती आयोगाच्या संकल्पना आणि राज्याने कोणत्या क्षेत्रात काम करण्याची अपेक्षा आहे याविषयी माहिती दिली.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

राज्याच्या विकासाचा वेग इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. तो वाढविण्यासाठी राज्य सरकार काम करीत आहे. तसेच राज्यात अनेक मोठे प्रकल्प आणि विकास कामे सुरू असून त्यांना गती दिली जात आहे. राज्यात नवीन गुंतवणूक येत आहे. देवेंद्र फडणवीस</strong>, मुख्यमंत्री

मुंबईमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव तंत्रज्ञान आणि क्वांटम संगणक क्षेत्रात काम करावे. या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात संधी आणि क्षमता आहेत. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने केलेले काम देशात सर्वोत्कृष्ट आहे. राज्याचे हे काम देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरावे. महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा तयार आहे. त्यास आणखी वेग देण्यात यावा. सुरू असलेल्या विकासकामांचे वॉर रुमच्या माध्यमातून नियमित आढावा घेतला जावा – बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम, मुख्य कार्यकारी अधिकारी, निती आयोग

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtras growth momentum to continue says devendra fadnavis at niti aayog meeting zws