मुंबईः ग्राहकांना कागदपत्रांशिवाय मोबाईल सिमकार्ड पुरवणाऱ्या विक्रेत्याला गुन्हे शाखेने मानखुर्द येथून अटक केली. युसुफ अली अब्दुल अली सय्यद (वय ३४) असे अटक आरोपीचे नाव असून तो ग्राहकांच्या कागदपत्रांची कोणतीही पडताळणी न करता त्यांना बेकायदा सिमकार्ड पुरवत होता. अशाप्रकारे आरोपीने गेल्या वर्षभरात अनेक सिमाकार्ड पुरवल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पोलीस त्याची पडताळणी करत आहेत.

गुन्हे शाखेच्या कक्ष-२ ने ही कारवाई केली. मुंबई गुन्हे शाखेच्या माहितीनुसार सय्यद मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या विविध कंपन्यांचे सिमकार्ड ओळख न पटवता. तसेच कागदपत्रांची पडताळणी न करता विकत होता. त्यासाठी तो प्रत्येक सिमकार्डमागे ५०० रुपये घ्यायचा. गुन्हे शाखेच्या कक्ष २च्या पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांना आरोपीविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सय्यदला पकडण्यासाठी एक तोतया ग्राहक पाठवला. त्यानंतर परिसरात सापळा रचण्यात आला होता. तोतया ग्राहकाने सय्यदकडे जाऊन सिमकार्ड मागितले.

सय्यदने कोणतीही ओळख पडताळणी न करता सिमकार्ड दिले आणि ५०० रुपये स्वीकारले. त्यानंतर तोतया ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. पोलीस पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी रंगेहाथ सय्यदला पकडण्यात आले. त्यांनंतर पोलिसांनी शोधमोहिम राबवली असता तेथे विविध कंपन्यांची सिमकार्ड सापडली. त्यातील ५७ सिमकार्ड पोलिसांनी जप्त केली.

सय्यदला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला मानखुर्द पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशा सिमकार्डचा वापर गुन्हेगारी कृत्यासाठी अथवा घातपाती कारवायांसाठी केला जाऊ शकतो. सायबर फसवणूकीसाठी मोठ्याप्रमाणात अशा प्रकारच्या सिमकार्डची आवश्यकता असते, त्यामुळे आरोपींचे ग्राहक कोण होते, याचा तपासणी करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट २ मध्ये कार्यरत पोलीस नाईक किरण गोपाळ परब (वय ४४) यांना सिमकार्डच्या बेकायदेशीर विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती.

प्राथमिक तपासातून माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तोतया ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून हा प्रकार उघड केला. आरोपी वर्षभरापासून अशाप्रकारे सिमकार्डची विक्री करत होता. त्याने आतापर्यंत किती सिमकार्ड विकली? तसेच त्याचे किती साथीदार आहेत? याबाबत पोलीस तपास करत आहेत. आरोपीविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.