मुंबई : विधान परिषद सभागृहात भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याच्या चित्रफितीमुळे वादग्रस्त ठरलेल्या माणिकराव कोकाटेंकडील कृषी खाते काढून क्रीडा हे खाते सोपविण्यात आल्यावरून कोकाटे यांची खिल्ली उडविण्यात येत आहे. रमी खेळणारे कोकाटे आता क्रीडामंत्री झाल्याने रमीला आता खेळाचा दर्जा मिळणार तसेच माणिकराव नव्हे ‘रमी’राव अशा शब्दांत त्यांना टोले लगावण्यात आले.

कोकाटे हे रमी खेळत असल्याची चित्रफीत आमदार रोहित पवार यांनी समोर आणल्यापासून गेला आठवडाभर वाद सुरू होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले. कोकाटे यांचे मंत्रीपद वाचले असले तरी त्यांच्याकडे क्रीडा हे तुलनेत दुय्यम दर्जाचे खाते सोपविण्यात आले आहे.

रमी खेळण्यावरून वादात सापडलेल्या कोकाटेंच्या वाट्याला नेमके क्रीडा खाते आल्याने समाजमाध्यमातून त्यांची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली. ‘माणिकराव कोकाटे यांचा उल्लेख राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या ‘एक्स’ खात्यावर ‘रमी’राव असा करण्यात आला. महायुतीमधील मंत्र्यांच्या कलागुणांना नक्कीच चालना मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

‘रमी’राव यांचे मन:पूर्वक अभिनंदन,’ अशी उपरोधिक टिप्पणी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा अधिकृत खेळ म्हणून रमीला मान्यता मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही. तसेही दिवसातील बराच वेळ ते सराव करीत असतात, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. रमी खेळणाऱ्या कोकाटेंकडे क्रीडा खाते सोपविण्यात आल्याने राज्यात आता रमीला चांगले दिवस येणार, अशी टीका कोकाटेंवर करण्यात आली.