लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ‘कोणतेही क्षेत्र निवडताना मनात संभ्रम असतो. त्यामुळे क्षेत्र निवडताना चूक होऊ शकते. परंतु निर्णय चुकला तरी एक पाऊल मागे जाऊन नवीन सुरुवात करण्यात काहीही वावगे नाही. मुलांच्या या प्रवासात पालकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी आत्मविश्वास व दृढनिश्चय असणे आवश्यक आहे. त्यानंतर व्यवस्थित नियोजन करणे आणि सातत्य राखणे महत्वाचे आहे’, असे ‘एमएसआरडीसी’चे सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीची दिशा सुस्पष्ट करणाऱ्या आणि विविध अभ्यासक्रमांची माहिती देणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात रविवार, २६ मे रोजी ‘एमएसआरडीसी’चे सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाने झाली. स्पर्धा परीक्षांसाठीच्या नियोजनाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधत जिंदल यांनी स्वत:चा प्रवास मांडला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी पालकांसह हजेरी लावली होती. माटुंगा पश्चिमेकडील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा >>>आयएएस अधिकारी मनुज जिंदल यांचा आज विद्यार्थ्यांशी संवाद; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मध्ये स्पर्धा परीक्षांसह विविध करिअर संधींबाबत मार्गदर्शन

‘प्रत्येकाच्या उपजत आवडीनिवडी असतात. त्यामुळे सर्वप्रथम स्वत:ची आवड ओळखणे महत्त्वाचे आहे. काही काळानंतर क्षेत्र बदलले तरी काही फरक पडत नाही. परंतु तुमचा आराखडा व योजना व्यवस्थित अमलात आणणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्याबाबत योग्य माहिती घेऊन नियोजन करा आणि पालकांशी संवाद साधा’, असेही जिंदल म्हणाले.

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीही करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करणारी विविध सत्रे झाली. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्या शंकांचे निरसन केले. आयुष्यात ताणतणावाचे नियोजन करून मानसिक आरोग्य कसे जपावे, याबाबत डॉ. राजेंद्र बर्वे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘नव्या वाटा’ या सत्राअंतर्गत युट्यूब – समाजमाध्यमे या विषयावर सुकीर्त गुमास्ते आणि वित्तक्षेत्रातील संधींबाबत कौस्तुभ जोशी यांनी मार्गदर्शन केले. नवनवीन अभ्यासक्रम व विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींचा मागोवा विवेक वेलणकर यांनी घेतला. कौशल्य विकास आणि त्यामधील विविध संधींबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रतिनिधी पंकज तावडे यांनी मार्गदर्शन केले. तर परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत बख्तावर कृष्णन यांनी संवाद साधला.

‘स्मार्टफोन’चे व्यसन धोकादायक

‘स्मार्टफोन’चे व्यसन हे धोकादायक असून समाजमाध्यमांपासून दूर राहण्यासाठी इतर विविध गोष्टींमध्ये गुंतून राहणे, मनावर ताबा असणे गरजेचे आहे. तसेच नानाविध चांगल्या गोष्टींचा सराव करीत राहा, सुरुवातीला कंटाळवाणे वाटेल. पण जवळपास एक महिन्यानंतर संबंधित गोष्टींमध्ये तुमची आवड निर्माण होईल, असे मत जिंदल यांनी व्यक्त केले.

मुख्य प्रायोजक : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक : सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन अकॅडमी, संकल्प आय ए एस फोरम, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स

बँकिंग पार्टनर : युनियन बँक ऑफ इंडिया

पॉवर्ड बाय : ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, आदित्य स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

(स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाच्या नियोजनासह वेळेचे गणित कसे जुळवावे, व्यक्तिमत्व विकास कसा करावा, याबाबत ‘एमएसआरडीसी’चे सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच जिंदल यांनी स्वत:चा प्रवास मांडत विविध अनुभव अनुभवही सांगितले.)