मुंबई : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातून (एसईबीसी) प्रवेश देण्यात येत असल्याने त्याचा परिणाम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील प्रवर्गातील (ईडब्ल्यूएस) प्रवेशावर झाला आहे. एसईबीसीमुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील प्रवाशांमध्ये मागील तीन वर्षांमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर केलेल्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे. कक्षाने सादर केलेल्या अहवालानुसार २०२३-२४ मध्ये राज्यात ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ११ हजार १८४ जागा होत्या. या जागांवर ७ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेशाची टक्केवारी ६५.७४ टक्के एवढी होती. २०२४-२५ मध्ये जागांची संख्या १२ हजार ७०४ झाली, मात्र प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किंचिंत कमी झाली. २०२४–२५ मध्ये ७ हजार २७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गात १ हजार ६८९ इतक्या जागा वाढल्याने उपलब्ध जागांची संख्या १४ हजार ३९३ इतकी झाली. मात्र प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ ने घटली असून २०२५-२६ मध्ये ७ हजार २४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तीन वर्षांमध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १११ ने कमी झाली, मात्र या काळात ईडब्ल्यूएससाठी उपलब्ध जागांची संख्या सातत्याने वाढल्याने प्रवेशाची टक्केवारी ६५.७४ वरून ५०.३१ टक्क्यांवर घसरली.
राज्य सरकारने काढलेल्या शासननिर्णयामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळत नाही. परिणामी, मराठा समाजातील मुलांचा एसईबीसी प्रवर्गातून प्रवेश घेण्याकडे कल वाढला आहे. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, कृषी, विधि यांसारख्या काही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांकडे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र होते. या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास १ हजार ५०० इकरी होती. तहसीलदार कार्यालयाकडून झालेल्या तांत्रिक चुकीमुळे त्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र दिल्याचे तपासणीअंती उघडकीस आले. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातूनच प्रवेश देण्यात आले. त्यामुळे ईडब्ल्यूएसमधून प्रवेश अधिक दिसत असले तरी ते कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
