मुंबई : चेंबूर येथील मल्हार हॉटेलनजीकच्या शीव आशिष इमारतीतील २ हजार चौरस फूट जागेतील बाटाच्या दुकानाला सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत शोरुममधील चपला, बुटांसह अन्य वस्तूंचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. तसेच, अदानी इलेक्ट्रिसिटी व संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

शीव आशिष या औद्योगिक इमारतीतील तळमजल्यावरील बाटा शोरुममध्ये आग लागली होती. काहीच वेळात आग तळघरापर्यंत पसरली. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने आग भीषण स्वरूपाची (वर्दी क्रमांक.१) असल्याचे घोषित केले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीमुळे शोरुममधील विद्युत यंत्रणा, विजेच्या तारा, चप्पल – बुट, बॉक्स, कागदपत्रे आदी वस्तू जळून खाक झाल्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलातर्फे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.