मुंबई : ‘दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९’ मार्गिकेच्या कामाअंतर्गत बांधण्यात आलेल्या प्लेझंट पार्क – सुंदरनगर दुमजली पुलावर वर्षभरातच खड्डे पडले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) खड्डे बुजवल्यानंतर महिन्याभरातच पुन्हा खड्डे उखडले. त्यामुळे पुलाच्या कामाबरोबरच दुरुस्तीच्या कामावरही स्थानिक रहिवाशांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आता एमएमआरडीएने पुन्हा शुक्रवारपासून खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

‘मेट्रो ९’ मार्गिकेमुळे मिरा – भाईंदरमधील प्लेझंट पार्क, हटकेश आणि सिल्व्हर पार्क येथे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने एक किमी लांबीचा दुमजली पूल बांधला. हा पूल ऑगस्ट २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. मात्र हा पूल सेवेत दाखल होऊन वर्ष होत नाही तोच त्यावर खड्डे पडले असून काही ठिकाणी पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पाणी साचत आहे. यासंबंधीचे वृत्त सप्टेंबरमध्ये ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एमएमआरडीए खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली.

मात्र खड्डे बुजवून महिना होत नाही तोच बुजवलेले खड्डे उखडल्याचे निदर्शनास आले आहे. एमएमआरडीए आणि कंत्राटदाराने खड्डे बुजविण्याच्या नावाखाली केवळ मलमपट्टी केल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवासी ॲड. कृष्णा गुप्ता यांनी केला आहे. दरम्यान, बुजवलेले खड्डे उखडल्याचे वृत्त शुक्रवारी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पुलाची तपासणी केली. या तपासणीत ३-४ ठिकाणी मास्टिक डांबरच्या थराचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. तर सल्लागारालाही पुलाची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून एक्स (ट्विटर) समाज माध्यमातून देण्यात आली आहे.

खड्डे व्यवस्थितपणे बुजवण्यात आले होते. मात्र नुकतेच खड्डे बुजवलेल्या ठिकाणीच एक अपघात झाला आणि त्यामुळे मास्टिक डांबराचे नुकसान झाले, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी याविषयी विचारणा केली असता सांगितले. दोषदायित्व कालावधीअंतर्गत कंत्राटादारकडून दुरुस्तीचे काम करून घेण्यात येत आहे. आता १०-१२ मीटरचा संपूर्ण भाग खोदून त्याची योग्य प्रकारे दुरूस्ती करण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे व्हावे, कायमस्वरुपी दुरुस्ती व्हावी अशी मागणी ॲड. गुप्ता यांनी केली आहे. त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.