मुंबई…सोमवारच्या अतिमुसळधार पावसात उपनगरीय लोकल सेवेचा वेग मंदावला. पण त्याचवेळी दुसरीकडे मुंबईतील चार मेट्रो मार्गिकांवरील मेट्रो सेवा दिवसभर सुरळीत सुरु होती. पावसाचा कोणताही परिणाम मेट्रो सेवेवर झाला नाही. चारही मेट्रो मार्गिकांवरील मेट्रो गाड्या वेळापत्रकाप्रमाणे धावत होत्या. त्यामुळे मेट्रो सेवा मुंबईकरांसाठी पावसात प्रवासाचा एक चांगला पर्याय ठरली.

घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ , दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ, दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ आणि आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक भुयारी मेट्रो ३ अशा चार मार्गिका सध्या मुंबईत वाहतूक सेवेत आहे. मेट्रो १,२ अ आणि ७ मार्गिकेवरील प्रवासी संख्येत काही महिन्यांपासून चांगली वाढ होत आहे. मेट्रो ३ मार्गिकेला प्रवाशांची प्रतीक्षा आहे. असे असले तरी मेट्रो हळूहळू मुंबईकरांच्या पसंतीस पडत असल्याचे चित्र आहे. अशात सोमवार मुसळधार पावसात अनेकांनी मेट्रोने प्रवास करण्यास पसंती दिली. पावसामुळे उपनगरीय रेल्वे मार्गिकांवरील रुळांवर पाणी साचले. त्यामुळे लोकल गाड्यांचा वेग मंदावला. लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.

त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातल्या त्यात सोमवारी एकमेव दिलासा हा होता की मुसळधार पावसातही रेल्वे सेवेचे वेग मंदावला तरी सेवा ठप्प झाली नव्हती. मात्र त्याचवेळी दुसरीकडे मुंबईतील चारही मेट्रो सेवांवर मुसळधार पावसाचा कोणताही परिणाम झाला नाही. मेट्रो १,२ अ,७ आणि ३ मार्गिकेवरील गाड्या वेळेत धावत होत्या. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिलेल्या माहितीनुसार मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेवरुन दुपारी २ वाजेपर्यंत १ लाख ३० हजार २५६ प्रवाशांनी प्रवास केला. तर पावसाचा जोर पाहता प्रवासी संख्या वाढल्यास त्यांना सामावून घेण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेसाठी चार मेट्रो गाड्या राखीव ठेवल्या होत्या. तर प्रवासांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकही दिला होता.

मेट्रो सेवा सुरळीत, अखंड सुरु असल्याने मुख्यमं त्र्यांनीही मेट्रो सेवेचे कौतुक केले. मेट्रोचे अनेक फायदे आहेत. जेव्हा खूप पाऊस असतो तेव्हा मेट्रो सुरळीत,व्यवस्थित सुरु असते हा मेट्रोमधील एक फायदा. आज १७७ मिलिमीटर पाऊस पडल्यानंतरही मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे वाहतूक सेवेचा एक चांगला पर्याय मेट्रो ठरेल. सर्व मेट्रो मार्गिकांचे जाळे पूर्ण झाल्यास याचा प्रत्यय येईल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो सेवेचे कौतुक केले.

मोनोरेल स्थानकावर गळती

मेट्रोप्रमाणेच सोमवारी चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिकेवरील सेवाही सुरळीत सुरु होती. मात्र मोनोरेल मार्गिकेवरील फर्टिलायझर मेट्रो स्थानकावर गळती होत असल्याचे चित्र होते. मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने कर्मचार्यांनी गळतीच्या ठिकाणी बादल्या लावल्या होत्या. मेट्रो स्थानकांमध्ये गळती होत असल्याचे याआधी अनेकदा समोर आले आहे. पण आता मोनोरेल स्थानकावरही गळती होताना दिसत आहे.