मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ (११७ भूखंडांसह) घरांसाठी उद्या, बुधवारी सोडत काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १ वाजता सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोडतीत २४ हजार ९११ पात्र अर्जदार सहभागी होणार असले तरी त्यातील ९० टक्क्यांहून अधिक अर्थात २३ हजार ५७४ अर्जदार हे २० टक्के योजनेतील ५९४ घरांच्या सोडतीत सहभागी होणार आहेत. २० टक्क्यांतील घरांना अर्जदारांनी सर्वाधिक पसंती देतानाच म्हाडा गृहनिर्माण आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरांना नापसंती दिली आहे. त्यामुळे या योजनेतील ७१३ घरांसाठी अर्जच आलेले नाहीत. शून्य प्रतिसादामुळे ती घरे रिक्त राहणार असून रिक्त घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण मंडळाकडून २२६४ घरांसाठी ११ आॅक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मूळ वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया १० डिसेंबरपर्यंत होणार होती तर सोडत २७ डिसेंबरला काढण्यात येणार होती. मात्र विहित मुदतीत घरांना प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. परिणामी सोडतीची तारीख दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अखेर सोडतीला मुहुर्त मिळाला आणि ५ फेब्रुवारीला सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उद्या, बुधवारी ठाण्यात सोडत काढली जाणार आहे. या सोडतीकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान बुधवारची सोडत नेमकी किती घरांसाठी असेल याबाबत कोकण मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे विचारणा करण्यात आली, मात्र त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला.

कोणत्या घरांसाठी किती अर्ज

कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी एकूण २४ हजार ९११ पात्र अर्ज सादर झाले आहेत. १५ टक्के योजनोतील ८२५ घरांसाठी केवळ ४१७अर्ज दाखल झाले असून ४०८ घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८ घरांसाठी केवळ ४३४ अर्ज दाखल झाले असून ३०५ घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान २२६४ घरांच्या सोडतीतील ११७ भूखंडांसाठी १४७ अर्ज सादर झाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada 2264 houses konkan mandal draw will be declared on 5th february by eknath shinde mumbai print news css