मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांसाठी ९ ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार होती. त्यासाठी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जदारांची प्रारूप यादी मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात येणार होती. या यादीकडे अर्जदार डोळे लावून बसले होते, मात्र यादी प्रसिद्ध झाली नाहीच, याउलट कोकण मंडळाने सोडतीची आणि प्रारूप यादीची प्रसिद्धीची तारीखच पुढे ढकलण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रक जारी केले. त्यानुसार आता यादी १ ऑक्टोबरला प्रसिध्द केली जाणार आहे तर सोडत ११ ऑक्टोबरला काढली जाणार आहे. प्रारुप यादीचे काम पूर्ण न झाल्याने कोकण मडंळावर ही नामुष्की आली आहे. मंडळाच्या या कारभारावर अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोकण मंडळाकडून २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ५६५, एकात्मिक योजनेतील ३००२, म्हाडा योजनेतील १६७७, इतर योजनेतील ४१ घरांसह ७७ भूखंडांच्या सोडतीसाठी जुलैपासून सोडतपूर्व प्रक्रिया सुरू होती. सोडतीला प्रतिसाद नसल्याने सोडतपूर्व प्रक्रियेस मंडळाने दोन वेळा मुदतवाढ दिली. त्यामुळे सोडतही दोन वेळा लांबणीवर पडली. दरम्यान नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया पार पडली असून आता पात्र अर्जांच्या प्रारुप यादीच्या आणि त्यानंतर अंतिम यादीची प्रतीक्षा दीड लाखांहून अधिक अर्जदारांना आहे. अशात अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्ध करण्याची तारीख दोन वेळा कोकण मंडळाने चुकवली.
२२ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता ही यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र ही यादी प्रसिद्ध करण्याच्या काही दिवस आधी यादी प्रसिद्ध करण्याची तारीख अचानक पुढे ढकलली. २२ सप्टेंबरऐवजी ३० सप्टेंबरला अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्ध होणार होती. त्यानुसार अर्जदारांचे डोळे या यादीकडे लागले होते. पण सायंकाळी ६ वाजता यादी प्रसिद्ध झालीच नाही.
याविषयी कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता अर्जांची संख्या अधिक असून यादीच्या कामास वेळ लागत आहे. त्यामुळे यादी मंगळवारऐवजी बुधवारी प्रसिद्ध करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तर त्यानंतर मंडळाकडून एक प्रसिद्धी पत्रक काढत यादीची आणि सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. ३० सप्टेंबरची यादीची तारीख १ ऑक्टोबर तर ९ ऑक्टोबरची सोडतीची तारीख ११ ऑक्टोबर अशी करण्यात आली आहे.
यावर अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याआधी यादी प्रसिद्धीची तारीख पुढे ढकलण्यात आली तेव्हा या संबंधी कोणताही संदेश आम्हाला आमच्या मोबाइलवर किंवा ई – मेलवर आला नाही. आजही यादी प्रसिद्ध झालेली नाही. त्यात आता सोडत आणि इतर प्रक्रियाच पुढे ढकलण्यात आली आहे हे आम्हाला प्रसार माध्यमातून समजते. आम्ही हक्काच्या घराच्या स्वप्नाच्या अनुषंगाने आमचा अर्ज पात्र ठरला आहे का याकडे लक्ष लावून आहोत, सोडतीकडे डोळे लावून आहोत. अशावेळी आम्हाला व्यवस्थित माहिती मिळत नसेल तर ही बाब अयोग्य असल्याची प्रतिक्रिया एका अर्जदाराने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.
जुलैपासून लाखो अर्जदारांचे अनामत रक्कमेचे पैसे म्हाडाकडे अडकून आहेत. आम्ही कर्ज काढून, उसनवारीने अनामत रक्कमेसह अर्ज भरले आहेत. अशा वेळी दोन वेळा सोडत पुढे ढकलली जाते. त्यानंतर प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यासही विलंब होत झाला. तर आता सोडत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ही बाब गंभीर असल्याचे एका अर्जदाराने सांगितले. दरम्यान कोकण मंडळाच्या संथ कारभाराचा फटका अर्जदारांना बसत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मंडळाकडून एक लाख ५८ हजार अर्जांची यादी अंतिम करण्यास विलंब झाल्याने सोडत पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवल्याचेही म्हटले जात आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी अडीच लाखांहून अधिक अर्ज येतात, मात्र त्यांच्याकडून यादी प्रसिध्द करण्यास केव्हाही विलंब झालेला नाही. त्यामुळे कोकण मंडळाच्या कामावर नाराजी व्यक्त होत आहे.