मुंबई : Mhada Konkan Mandal Lottery 2023 म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ घरांसाठी (१४ भूखंडांसह) बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात आली. मात्र या सोडतीत ४,६५४ पैकी केवळ २,२१९ घरे विकली गेली असून २४३५ घरांना प्रतिसादच मिळू शकला नाही. या घरांसाठी अर्जच करण्यात आलेला नाही. यामध्ये मोठ्या संख्येने पंतप्रधान आवस योजना आणि ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील विरार-बोळींजमधील घरांचा समावेश आहे. त्यामुळे ही घरे मंडळासाठी डोकेदुखी बनू लागली आहेत. आता या घरांचा पुढील सोडतीत समावेश करण्यात येणार आहे.

ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई येथील ४,६५४ घरांसाठी ४८ हजारांहून अधिक अर्जदार बुधवारच्या सोडतीत सहभागी झाले होते. मात्र यापैकी केवळ २,२१९ जणांचेच हक्काच्या घराचे स्वप्न सोडतीच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. एकूण ४,६५४ पैकी केवळ २,२१९ घरांनाच प्रतिसाद मिळाला असून २,४३५ घरांसाठी अर्जच करण्यात आले नव्हते. त्यामुळे ही घरे सोडतीत विकली गेली नाहीत. कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा गृहनिर्माण, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि पंतप्रधान आवास योजनेतील एकूण २,६०६ घरांपैकी केवळ १८६९ घरांसाठीच अर्ज सादर झाले होते. सादर झालेल्या अर्जांची संख्या ४८ हजार ८०५ अशी होती. तर उर्वरित ७३७ घरांसाठी अर्जच न आल्याने ही  ७३७ घरे विक्रीविना राहिली आहेत. यात पंतप्रधान आवास योजनेतील घरांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेची कामे, निविदांमध्ये गैरव्यवहार नाही; आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांवर आयुक्तांचे स्पष्टीकरण

मंडळाच्या ४,६५४ घरांपैकी २,०४८ घरे ही ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतील होती. विरार-बोळींजमधील या २,०४८ घरांपैकी केवळ ३५० घरांसाठी अनामत रक्कमेसह ३६९ अर्ज सादर झाले होते.  त्यामुळे साहजिकच या योजनेतील १,६९८ घरे विक्रीविना पुन्हा रिकामी राहिली आहेत. पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नसल्याने आणि इतर काही कारणांमुळे ही घरे पुन्हा पुन्हा सोडतीत समाविष्ट करूनही विकली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही घरे मंडळासाठी डोकेदुखी बनू लागली आहेत. एकूणच या सोडतीत निम्मी घरे विकली गेली नसून आता पुन्हा या घरांसाठी सोडत काढण्याची वेळ मंडळावर आली आहे.