मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पंतप्रधान आवास योजनेतील पुणे, सांगली आणि सोलापूरमधील घरे दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही विकली गेलेली नाहीत. या घरांची विक्री करण्यासाठी आता पुणे मंडळाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वाने ती वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची शुक्रवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. इच्छुकांना सोडतीविना आधी अर्ज करून घर खरेदी करता येणार आहे. या घरांच्या किंमती ७ लाखांपासून ते १५ लाख रुपयांदरम्यान आहेत.
अर्जदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने म्हाडाची काही घरे रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले आहे. महागड्या घरांसह अन्य कारणांमुळे अनेकदा सोडत काढूनही घरे विकली जात नसल्याने अखेर म्हाडाच्या विविध मंडळातील घरांची विक्री आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वाने करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार पुणे मंडळाने पुण्यातील म्हाळुंगे, शिरुर, चाकणमधील, सोलापूरातील करमाळामधील आणि सांगलीतील मिरजमधील रिक्त ३११ घरांच्या प्रथम प्राधान्य विक्रीसाठी शुक्रवारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळासह ‘बुक माय होम’ या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहे. तर प्रत्यक्ष पुणे मंडळाच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत जाऊनही अर्ज भरता येणार आहे. सोडतीविना या घरांचे वितरण केले जाणार असले तरी यासाठी सोडतीतील पात्रतेच्या काही अटी लागू होणार आहेत.
ही घरे अत्यल्प उत्पन्न गटातील असल्याने अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नसावे. तर या घरांच्या वितरणासाठी सामाजिक आरक्षण लागू असणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती आणि सर्वसाधारण जनता अशा प्रवर्गाद्वारे घरांची विक्री केली जाणार आहे. पत्रकार, कलाकार आदी प्रवर्गांचे आरक्षण यात नाही.
चाकण म्हाळुंगे येथील घर १३ लाख ६१ हजार, शिरुरमधील घर १४ लाख ७२ हजार आणि १५ लाख १ हजार, चाकणमधील घर ११ लाख ५० हजार आणि ६ लाख ९५ हजार, करमाळा येथील घर ७ लाख २५ हजार, मिरजमधील घर १३ लाख ४३ हजार आणि १५ लाख ८ हजार, तसेच सागली कर्नाळा रोड येथील घर ८ लाख ९५ हजार रुपयांत वितरित केले जाणार आहे.