मुंबई :  म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात वर्षानुवर्षे राहणार्‍या मूळ भाडेकरूंना हक्काची कायमस्वरूपी घरे देण्यासाठी बृहतसूचीअंतर्गत अर्ज प्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार बुधवार, १५ जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करून याच दिवसापासून अर्ज प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे. ही अर्ज प्रक्रिया १५ ते ३१ जानेवारीदरम्यान सुरू राहणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून अर्जदारांना सोडतीद्वारे कायमस्वरूपी हक्काच्या घराचे वितरण केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण मुंबईतील जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त अतिधोकादायक आणि कोसळलेल्या इमारतींमधील मूळ भाडेकरूंना दुरूस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येते. या मूळ भाडेकरूंच्या इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर ते आपल्या हक्काच्या घरात राहावयास जातात. मात्र मोठ्या संख्येने कोसळलेल्या वा अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास होत नाही. अशावेळी संबंधित इमारतींमधील मूळ भाडेकरूंना संक्रमण शिबिरातच राहावे लागते आणि त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न धूसर बनते. ही बाब लक्षात घेता म्हाडाने कोणत्याही कारणाने कधीच पुनर्विकास होऊ न शकणाऱ्या इमारतींमधील मूळ भाडेकरूंना हक्काची घरे देण्यासाठी मास्टरलिस्ट अर्थात बृहतसूची तयार करण्याचा निर्णय घेतला. बृहतसूचीच्या प्रक्रियेनुसार मूळ भाडेकरूंकडून मागवलेल्या अर्जांच्या छाननीअंती पात्र अर्जदारांना सोडतीद्वारे घरे देण्यात येतात. दुरुस्ती मंडळाला उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाद्वारे विकासकांकडून मिळणारी अतिरिक्त घरे या मूळ भाडेकरूंना वितरीत केली जातात.

हेही वाचा >>>‘आयडॉल’ची आज परीक्षा; मात्र काही विद्यार्थ्यांच्या हातात ‘प्रवेशपत्र’च नाही; मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण

या बृहतसूचीद्वारे दुरूस्ती मंडळाकडून आतापर्यंत शेकडो मूळ भाडेकरूंना हक्काची कायमस्वरुपी घरे देण्यात आली आहेत. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचाही आरोप होत आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली असून आरोप सिद्धही झाले आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी आता सोडत आणि बृहतसूचीची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय करण्यात आली आहे. मात्र संगणकीय पद्धतीने डिसेंबर २०२३ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतही गैरप्रकार झाल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी सुरू आहे. आता दुरूस्ती मंडळाने शिल्लक आणि मागील दोन वर्षांत विकासकांकडून प्राप्त झालेल्या घरांसाठी मूळ भाडेकरूंकडून अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला नुकतीच म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मान्यता दिली. त्यानुसार बुधवारी अर्ज मागविण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून बुधवारपासूनच अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती दुरूस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, अर्ज प्रक्रिया १५ ते ३१ जानेवारीदरम्यान सुरू राहणार असून त्यानंतर अर्जांची छाननी करून पात्रता निश्चिती केली जाणार आहे. पात्रता निश्चिती झाल्यानंतर उपलब्ध घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada to invite applications for comprehensive list application process from january 15 to 31 mumbai print news amy