मुंबई : ‘एमएचटी – सीईटी २०२४’ या सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालासंदर्भात (पीसीएम आणि पीसीबी गट) विविध आक्षेप घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर तांत्रिक बाबींच्या परिपूर्ततेनंतर विद्यार्थ्यांना २७ व २८ जून रोजी सीईट कक्षाच्या संकेतस्थळावरून त्यांच्या लॉगिनमध्ये उत्तरपत्रिका व उत्तरतालिका पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी कक्ष) आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.

दिलीप सरदेसाई यांच्यासोबत उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि तंत्र शिक्षण विभागाचे संचालक विनोद मोहितकर यांनी शनिवार, २२ जून रोजी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ‘एमएचटी – सीईटी’ परीक्षा पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. हीच पद्धत नंतर केंद्र सरकारने स्वीकारली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच एकाच वेळी सात लाख विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा दिली, तर पेपरफुटी व इतर गैरप्रकार घडू शकतात. तसेच, सध्या उपलब्ध असणाऱ्या आयटी यंत्रणेनुसार एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीनेही परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे विविध सत्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येते. संगणकाधारित परीक्षा पद्धतीमुळे पारदर्शकता आहे’, असे दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : मुंबई: बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून बंद

‘शिक्षण हे करिअरच्या व आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, त्यामुळे याठिकाणी कोणी राजकारण आणू नये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचीही प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहोत, त्यामुळे कोणीही अपप्रचार करून गोंधळाची परिस्थिती निर्माण करू नये’, असे डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले. तर विनोद मोहितकर म्हणाले की, ‘सीईटी कक्ष हा कायदेशीर पद्धतीने व समन्वयानेच कार्यवाही करतो. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया संगणकाधारित आणि केंद्रीय पद्धतीने राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे’.

ग्राह्य आक्षेपांची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात

विविध आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या रक्कमेपैकी जे आक्षेप ग्राह्य धरण्यात आले आहेत, अशा ५४ जणांना त्यांनी जमा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येईल. तसेच, सर्व सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी तुकडीप्रमाणे पर्सेन्टाइल पध्दतीने निकाल जाहीर करण्यात येतो. ही परीक्षा पद्धत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून राबविण्यात येत आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पाच वर्षीय विधि अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी – सीईटी २०२४’ परीक्षेचा निकाल येत्या २ ते ३ दिवसांत जाहीर करण्यात येईल, असेही यावेळी दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पावसाळ्यात ‘रिमोट कंट्रोल्ड व्हिज्युअल फ्लोट कॅमेऱ्या’ने भुयारी गटारांची पाहणी करणार, पावसाळ्यात पश्चिम रेल्वे सज्ज

सीईटी कक्षाच्या आयुक्तांना जबाबदार धरून निलंबित करा – आदित्य ठाकरे

‘एमएचटी – सीईटी’च्या निकालासंदर्भातील विविध आक्षेप व मुद्द्यांसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन चर्चा केली आणि पत्राद्वारे विविध मुद्दे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. या परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाची निष्पक्ष चौकशी आणि गैरप्रकाराची जबाबदारीही निश्चित करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच राज्यातील सीईटी कक्षाच्या आयुक्तांना याप्रकरणी जबाबदार धरून निलंबित करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे राज्यपालांकडे केली. तसेच मुंबई विद्यापीठाची रखडलेली नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक आणि मुंबई विद्यापीठ प्रशासन परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करूनही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास एक महिन्याचा विलंब करते, या गोष्टी लवकरात लवकर मार्गी लावण्यात याव्यात, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली.