मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘गुंदवली – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ’ मार्गिकेतील एक महत्त्वाचा टप्पा सोमवारी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. या मार्गिकेवरील दुसऱ्या आणि अंतिम बोगद्याचे १.६५ किमीचे भुयारीकरण पूर्ण करून ‘ध्रुव’ नावाचे टनेल बोरींग यंत्र (टीबीएम) सोमवारी भुगर्भातून बाहेर आले. तब्बल २० महिन्यांनंतर हे टीबीएम भुयारीकरण यशस्वीपणे पूर्ण करून बाहेर आले.

एमएमआरडीएच्या ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेचा गुंदवली – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा विस्तार ‘मेट्रो ७ अ’ मार्गिकेच्या माध्यमताून करण्यात येत आहे. ‘मेट्रो ७ अ’ ही मार्गिका ३.४ किमी लांबीची असून यापैकी ०.९४ किमीचा भाग उन्नत आणि २.५०३ किमी लांबीचा मार्ग भुयारी आहे. तसेच एक मेट्रो स्थानक भुयारी आणि एक मेट्रो स्थानक उन्नत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाला विमानतळाशी जोडणाऱ्या या मार्गिकेचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. या भुयारी मार्गिकेसाठी जाण्या-येण्यासाठी दोन बोगदे बांधण्यात येत आहे. त्यानुसार १ सप्टेंबर २०२३ रोजी १.६४७ किमीच्या डाऊन मार्गिकेच्या भुयारीकरणासाठी ‘दिशा’ नावाचे टीबीएम लाॅन्चिंग शाफ्टमध्ये म्हणजेच ३० मीटर खोल विहिरीतून भूगर्भात सोडण्यात आले होते. तब्बल १७ महिन्यांनंतर १७ जानेवारी २०२५ रोजी भुयारीकरण पूर्ण करून ‘दिशा’ टीबीएम बाहेर आले. आता सोमवारी, १४ जुलै ‘ध्रुव’ टीबीएम भुगर्भातून बाहेर आले आहे.

मार्गिकेचे ६१ टक्के काम पूर्ण

मेट्रो ७ अ मार्गिकेवरील अप मार्गिकेच्या १.६५ किमीच्या भुयारीकरणासाठी ‘ध्रुव’ टीबीएम ४ नोव्हेंबर २०२३ रोजी भूगर्भात सोडण्यात आले होते. तब्बल २० महिन्यांनंतर १.६५ किमीचे भुयारीकरण पूर्ण करून हे टीबीएम सोमवारी यशस्वीपणे बाहेर आले आहे. या मार्गिकेतील दोन्हीही बोगदे पूर्ण झाल्याने एमएमआरडीएने मार्गिकेतील कामाचा एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आता या मार्गिकेच्या कामालाही वेग येणार आहे. या मार्गिकेचे आतापर्यंत ६१ टक्के काम पूर्ण झाले आहे. तेव्हा लवकरात लवकर उर्वरित काम पूर्ण करून ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.