मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गणेशोत्सवानिमित्त ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’च्या वेळापत्रकात बदल केला आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एमएमआरडीएने या दोन्ही मेट्रोंच्या सेवा कालावधीत एक तासाने वाढ केली आहे. दोन्ही मार्गिकांवरील सेवा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर असे ११ दिवस रात्री ११ ऐवजी १२ पर्यंत सुरू राहणार आहे.
एमएमआरडीएच्या ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील सेवा सकाळी ५.३० ते रात्री ११ दरम्यान सुरू असते. गणेशोत्सवादरम्यान मात्र सेवा कालावधी वाढवला जातो. गणपती दर्शनासाठी, देखावे पाहण्यासाठी आणि विसर्जनासाठी जाणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना रात्री उशिरापर्यंत मेट्रोचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी रात्रीच्या सेवा कालावधीत वाढ करण्यात येते. त्यानुसार यावेळीही गणेशोत्सवातील ११ दिवस ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा सेवा कालावधी वाढविण्यात आला आहे. एमएमआरडीएच्या निर्णयानुसार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील शेवटची गाडी रात्री ११ ऐवजी मध्यरात्री १२ वाजता सुटणार आहे.
११ दिवसांसाठी सेवा कालावधी एक तासाने वाढविल्याने मेट्रो गाड्यांच्या दैनंदिन फेऱ्यामध्येही वाढ होणार आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान दररोज या मार्गिकांवर ३०५ फेऱ्या होतात. पण गणेशोत्सवातील ११ दिवसांच्या कालावधीत दररोज सोमवार ते शुक्रवारदरम्यान १२ फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे ११ दिवसांच्या कालावधीत दररोज मेट्रो गाड्यांच्या ३१७ फेऱ्या होणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.
सोमवार ते शुक्रवारदरम्यान फेऱ्या वाढल्याने दर ५ मिनिटे ५० सेकंदांनी एक गाडी धावणार आहे. तर गर्दी नसलेल्या वेळेत दर ९ मिनिटे ३० सेकंदांनी एक गाडी सुटणार आहे. तसेच सेवा कालावधी वाढविल्याने प्रतिदिन १२ फेऱ्या वाढणार असून एकूण फेऱ्यांची संख्या प्रतिदिन २५६ इतकी होणार आहे. तर रविवारी २१७ ऐवजी एकूण २२९ फेऱ्या होतील.