मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिकांच्या कारशेडचा तिढा सोडविण्याच्या हालचाली सुरू केल्या असून भविष्यात एकेका कारशेडच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ‘ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो ५’ मार्गिकेसाठी कशेळी येथे, तर ‘वडाळा-ठाणे-कासारवडवली आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४-४ अ’ मार्गिकेसाठी मोघरपाडा येथे प्रस्तावित कारशेडच्या कामाला मे २०२३ मध्ये सुरुवात करण्यात येणार आहे. या दोन्ही कारशेडच्या बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. ही प्रक्रिया एप्रिलपर्यंत पूर्ण होईल आणि पावसाळ्यापूर्वी खोदकामाला सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. त्यामुळे नव्या वर्षात दोन्ही कारशेडचे काम सुरू होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा- राज्यातील २,९०२ बसगाड्यांमध्ये नियमांची पायमल्ली; १,१३७ खासगी बसगाड्यांमधील अग्निशमन यंत्रणा बंद
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी १४ मेट्रो मार्गिकांचा प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. यापैकी ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’ आणि ‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – अंधेरी मेट्रो ७’ मार्गिकेतील डहाणूकरवाडी – दहिसर – आरे असा २० किमीचा टप्पा सेवेत दाखल झाला आहे. या मार्गिकांच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ’, ‘मेट्रो ४-४अ’, ‘मेट्रो ५’, ‘मेट्रो ६’ (लोखंडवाला – जोगेश्वरी-विक्रोळी) आणि ‘मेट्रो ९’ (दहिसर ते मीरा-भाईंदर) मार्गिकांचे काम वेगात सुरू आहे. यापैकी बहुतांश मार्ग लवकरच सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. असे असताना यापैकी काही मार्गिकांच्या कारशेडच्या जागांबाबत अद्याप निश्चिती नाही, तर काहींच्या जागेवरून वाद सुरू आहेत. आजघडीला चारकोपमध्ये एकमेव कारशेड (मेट्रो १ ची कारशेड वगळता) सेवेत आहे. तर ‘डी. एन. नगर – मंडाले मेट्रो २ ब’मधील मंडाले येथील कारशेडचे काम सुरू आहे. एमएमआरसीने (मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशन) आरेमधील मेट्रो ३ च्या कारशेडचे काम सुरू केले आहे. मात्र ‘मेट्रो ४ – ४अ’, ‘मेट्रो ६’, ‘मेट्रो ९’च्या कारशेडचा तिढा अद्याप कायम आहे.
कारशेडशिवाय मेट्रो सुरूच करता येणार नाही. त्यामुळे एमएमआरडीएने कारशेडचा तिढा सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. ‘मेट्रो ४-४ अ’चा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे कारशेडच्या जागेच्या भूसंपादनाला सुरुवात करून दुसरीकडे बांधकाम निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. येत्या एक/दोन दिवसात मोघरपाडा कारशेडच्या बांधकामासाठी निविदा जारी होईल अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. कशेळी कारशेडच्या कामासाठी निविदा जारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील दोन ते तीन महिन्यांत निविदा अंतिम करून कार्यादेश जारी करण्यात येतील. त्यानंतर मे २०२३ मध्ये कारशेडसाठी खोदकामास सुरू करण्यात येईल. या दोन्ही कारशेडच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आल्याचे श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.