नाशिकमध्ये खासगी प्रवासी बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर परिवहन विभागाने नियम धाब्यावर बसविणाऱ्या बस वाहतुकदारांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत राज्यातील दोन हजार ९०२ बसगाड्यांमध्ये नियमांची पायमल्ला झाल्याचे निदर्शनास आले. तर त्यापैकी एक हजार १३७ बसगाड्यांमधील अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नसल्याचे आढळून आले. १५ दिवस विशेष मोहीम राबवून नियम धाब्यावर बसविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या दिवाळीनिमित्त खासगी बसगाड्यांनाही गर्दी असून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होत आहे. बसगाड्यांमधील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा- पॅरिसवरून आले १५ कोटींचे अंमलीपदार्थ; नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक

खासगी प्रवासी आराम बस आणि डंपर यांची धडक झाल्यानंतर बसला लागलेल्या भीषण आगीत प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच नाशिक येथे घडली होती. या घटनेत काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत असल्याचेही चौकशीत आढळले होते. त्यामुळे शासन आणि परिवहन विभागाच्या भूमिकेवर टीका होऊ लागली होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी प्रवासी बसगाड्यांविरुद्ध ९ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यास सुरुवात झाली. ही कारवाई २३ ऑक्टोबरपर्यंत सुरू होती. राज्यातील विविध आरटीओंनी १५ दिवसांत ११ हजार ५११ खासगी प्रवासी बसगाड्यांची तपासणी केली. यापैकी तब्बल दोन हजार ९०२ बसगाड्यांमध्ये वाहतूकविषयक नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे उघड झाले. आरटीओने या बस चालक-मालकावर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून ७१ लाख १६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा- राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास धोक्याचा; १००४ पैकी ६१० अपघात प्रवण क्षेत्र राष्ट्रीय महामार्गावर

दोषी आढळलेल्या दोन हजार ९०२ पैकीही एक हजार १३७ बसगाड्यांमध्ये अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नसल्याचे आढळून आल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. एखाद्या बसला आग लागल्यास त्वरित आग विझवण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे. काही बसचे आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजेही कार्यरत स्थितीत नव्हते. याशिवाय ८५६ बसगाड्यांमध्ये इंडिकेटर, वायपर, रिफ्लेक्टर, टेल लाईट इत्यादी कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले. योग्यता प्रमाणपत्र नसतानाही वाहनचालक-मालक २३० बसगाड्या चालवित असल्याचे निदर्शनास आले. सध्या दिवाळी सुरू असून मुंबई महानगर, तसेच राज्याच्या विविध भागातील प्रवासी मोठ्या प्रमाणात खासगी बसगाड्यांमधून प्रवास करीत आहेत. नियमांची पायमल्ली करण्यात आलेल्या बसगाड्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतात.


राज्यातील खासगी बसवर झालेली अन्य कारवाई

आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत नसणे – ५५२

विनापरवाना अथवा परवान्याच्या अटीचा भंग करून वाहन चालविणे – ३५८ बस

बसमध्ये बेकायदेशीर फेरबदल – ५९ बस

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक – १०२ बस

मोटर वाहन कर न भरणे – २२५ बस

जादा भाडे आकारणे- १७ बस

अवैधरित्या टप्पा वाहतूक – ३९ बस

परवानगी नसतानाही अवैधरित्या मालवाहतूक करणे – ९५ बस