मुंबई : ठाणे -ते बोरिवली दरम्यानचे अंतर १२ मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत केवळ ५.२६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर दुसरीकडे मात्र बोगद्याच्या बोरिवलीच्या दिशेच्या लाॅन्चिंग शाफ्टचे (टनेल सोडण्यासाठी बनविण्यात येणारी विहीर) काम अद्याप सुरू झालेले नाही. अंदाजे ५०० झोपड्या हटविण्यात एमएमआरडीएला यश येत नसल्याने लाॅन्चिंग शाफ्टचे काम रखडले आहे. तर दुसरीकडे लाॅन्चिंग शाफ्टमध्ये सोडण्यासाठीचे दोन टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) काही दिवसांपूर्वीच दाखल झाल्या आहेत. मात्र लाॅन्चिंग शाफ्टसाठीची जागाच न मिळाल्याने दोन टीबीएम ठाण्याच्या कास्टींग यार्डमध्ये धूळ खात पडून आहेत.
ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी एमएमआरडीएने ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. ११.८ किमी लांबीच्या १८ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. भूमिपूजनानंतर एमएमआरडीएकडून कामाला सुरुवात करण्यात आली असून ठाणे येथे लाॅन्चिंग शाफ्ट तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. या लाॅन्चिंग शाफ्टमध्ये सोडण्यासाठी अर्जुन नावाचे आणि आणखी एक दुसरे टीबीएम ठाण्यातील कास्टींग यार्डमध्ये दाखल झाले आहे.
या टीबीएमची जुळवाजुळव सुरू असून लवकरच हे टीबीएम लाॅन्चिंग शाफ्टमध्ये सोडले जातील. मात्र बोरिवली लाॅन्चिंग शाफ्टचे काम अद्याप सुरू झालेले नाही. हे काम याआधीच सुरू होणे अपेक्षित होते. पण लाॅन्चिंग शाफ्टसाठीची अंदाजे ९ हजार चौ. मीटर जागाच एमएमआरडीएच्या ताब्यात आलेली नाही. या जागेवर ५७२ झोपड्या आहेत. त्यामुळे ५७२ झोपडीधारकांचे पुनर्वसन करून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. झोपडीधारकांना पुनर्वसनासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत, पण हे पर्याय मान्य नसल्याने आतापर्यंत केवळ ६५ झोपडीधारकांचेच स्थलांतर करण्यात एमएमआरडीएला यश आले आहे.
लाॅन्चिंग शाफ्टच्या जागेवरील अंदाजे ५०० झोपड्या हटत नसल्याने लाॅन्चिंग शाफ्ट रखडले असून त्याचा प्रकल्पावरही परिणाम होत आहे. त्यामुळेच आतापर्यंत प्रकल्पाचे केवळ ५.२६ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यास एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
लाॅन्चिंग शाफ्टसाठी आता सप्टेंबरचा मुहूर्त
याविषयी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी ५७२ पैकी केवळ ६५ झोपडीधारकांचेच विस्थापन झाल्याचे सांगितले. तर उर्वरित झोपड्या हटविण्याचे प्रयत्न सुरू असून सप्टेंबरमध्ये लाॅन्चिंग शाफ्ट तयार करण्याच्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतर टीबीएमची जुळवाजुळव करून दोन्ही टीबीएम मशीन बोरिवलीतील प्रकल्पस्थळी आणली जातील. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये बोरिवली लाॅन्चिंग शाफ्टमध्ये पहिले टीबीएम, तर जून २०२६ मध्ये दुसरे टीबीएम सोडले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.