मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेला वरळी-शिवडी उन्नत रस्ता आतापर्यंत पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र प्रभादेवी पुलाचे पाडकाम करुन त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्याच्या कामाला मुहुर्त लागत नसल्याने प्रकल्पाचा वेग मंदावला होता. पण आता मात्र प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे. कारण प्रभादेवी पुलाच्या पाडकामास सुरुवात झाली असून द्विस्तरीय पुलाच्या कामास लवकरच सुरुवात केली जाणार आहे. द्विस्तरीय पुलाचे काम १४ महिन्यात पूर्ण करून उन्नत रस्ता डिसेंबर २०२६ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे.

मुंबई ते नवी मुंबई प्रवास केवळ १२ मिनिटांत पार करणे अटल सेतूमुळे शक्य होत असताना सागरी किनारा मार्ग, वरळीवरुन अटल सेतूकडे अतिजलद जात यावे यासाठी एमएमआरडीएने ४.५ किमीचा आणि १७ मीटर रुंदीचा वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. अंदाजे १०५१ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या कामासा २०२१ मध्ये कंत्राटदार जे कुमारच्या माध्यमातून सुरुवात झाली. काम सुरु झाल्यापासून तीन वर्षात म्हणजे २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हा उन्नत रस्ता प्रभादेवी पुलावरुन जाणार होता.

आता प्रभादेवी पूल जुना झाल्याने आणि त्याची पुनर्बांधणी करणे गरेजेचे झाल्याने उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गतजुना पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधून उन्नत रस्ता शिवडीकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामात प्रभादेवी पुलालगतच्या १९ इमारती बाधित होणार होत्या. या इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने द्विस्तरीय पूल रखडला होता. त्याचा फटका उन्नत रस्ता प्रकल्पाला बसत होता. शेवटी एमएमआरडीएने द्विस्तरीय पुलाच्या संरेखनात बदल करून १९ ऐवजी केवळ दोन इमारती बाधित होतील असे संरेखन अंतिम केले. त्यास सरकारची मान्यता घेतली. तर दोन इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी एक-दोन पर्यायही दिले. मात्र हे पर्याय अमान्य करत रहिवाशांनी १९ इमारतींच्या समूह पुनर्विकासाची मागणी उचलून धरली. या मागणीबाबतचा अंतिम निर्णय न झाल्याने जुना पूल बंद करण्यास रहिवाशांचा विरोध होता. परिणामी उन्नत रस्त्याच्या कामास आणखी विलंब होत होता.

आता मात्र प्रभादेवी पुलाच्या पाडकामास सुरुवात झाली आहे. पुढील ६० दिवसांत पाडकाम पूर्ण करून त्यानंतर द्विस्तरीय पुलाच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. तर द्विस्तरीय पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी किमान १६ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र प्रभादेवी पूल बंद झाल्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता द्विस्तरीय पूलाचे आणि त्याबरोबरीने उन्नत रस्त्याचे १४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आतापर्यंत उन्नत रस्त्याचे ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. तेव्हा १४ महिन्यात काम पूर्ण करत डिसेंबर २०२६ मध्ये उन्नत रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.