शिंदे गटातील नेते तथा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. सत्तार यांच्या या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरत सत्तार यांच्याविरोधात आंदोलन केले होते. तसेच सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जात होती. सत्तार यांच्या याच विधानावर आता राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा खूप खालावत आहे. मी असा महाराष्ट्र कधीही पाहिला नव्हता, असे राज ठाकरे म्हणाले. ते आज (२७ नोव्हेंबर) मुंबईत मनसेच्या गटप्रमुखांना संबोधित करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली अन्…” असे धंदे मी करत नाही म्हणत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

“हल्ली कोणीही काहीही बरळत आहे. राजकारणाचा दर्जा खूप खाली जात आहे. त्याला मर्यादा राहिलेली नाही. राजकीय पक्षांचे प्रवक्ते काहीही बोलतात. राज्यातील एक मंत्री महाराष्ट्रातील महिला नेत्यावर अभद्र शब्दांत टीका करतो. आजपर्यंत मी असा महाराष्ट्र कधीही पाहिला नाही. इतपर्यंत आपली पातळी खाली गेली आहे का? इतक्या खाली आपल्याला जायचे असेल तर महारापरुषांची नावे घेणे बंद केले पाहिजे. काय बोलत असतात, त्यांची भाषा काय असते. त्यांना वाटते मी विनोद करतोय,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी टीका केली.

हेही वाचा >>> राज ठाकरेंची मुंबईत मोठी घोषणा! मनसेच्या आंदोलनांची माहिती देणारी पुस्तिका करणार प्रकाशित

“काही-काही लोक तर खूप काही बोलतात. तू कोण आहेस, आपली लायकी काय आहे. आपण काय बोलत आहोत, याचे भान नाही. शाळेत, कॉलेमध्ये असलेली मुलं जेव्हा टीव्ही चॅनेल्स पाहत असतील, प्रवक्त्यांना बोलताना पाहत असतील तर, त्यांना वाटेल राजकारण सोपे आहे. आपण महाराष्ट्राला कोठे घेऊन चाललो आहोत. याची मला जास्त चिंता वाटते,” अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >>> राज ठाकरेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल, म्हणाले “अरे गधड्या तुझी लायकी…”

राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. “महापुरुषांची बदनामी केली जात आहे. त्या दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते. ते गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की त्यांच्या मागे आर.डी. बर्मन बोलतात हेच समजत नाही. अरे गधड्या सावरकरांबद्दल बोलायची तुझी लायकी आहे का. सावरकर यांना कोठे ठेवले होते, त्यांनी काय हालअपेष्टा सहन केल्या, याची कल्पनातरी आहे का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray criticizes abdul sattar for commenting on supriya sule prd
First published on: 27-11-2022 at 21:01 IST