देवेंद्र फडणवीसांचा फ्रंटमॅन मोहित कम्बोज आहे. मोहित कंम्बोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन केले होते. मोहित कम्बोजच्या कंपन्यांमध्ये पैसा कुठून आला हे देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर आता भाजपा नेते मोहित कम्बोज यांनी संजय राऊत मला ओळखतात आणि त्यांना मी अनेकवेळा आर्थिक मदत केली आहे, असे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सलीम जावेदमधल्या जावेदने पत्रकार परिषद घेऊन आरोप लावले आहे. ६० मिनिटांच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नवाब मलिकांनी गेल्या पाच महिन्यांपासून सुरु केलेली गोष्ट पुढे नेली आहे. संजय राऊत पंतप्रधान मोदींपासून सुरु होऊन देवेंद्र फडणवीसांपर्यंत बोलतात. गेल्या पाच महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र सरकार माझ्याविरुद्ध जिंकू शकत नाही. पोलिसांचा दबाव आणि ट्विटरच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत. पण नवाब मलिकांनाही दोनदा न्यायालयात जाऊन जामीन घ्यावा लागला. हे लोक स्वतः अडकतात तेव्हा खोटी आरोप घेऊन समोर येतात,” असे मोहित कम्बोज म्हणाले.

मोहित कंम्बोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे – संजय राऊत

“मला ओळखत नाही असे म्हणणारे संजय राऊत माझ्या घरी ४ सप्टेंबर २०१७ रोजी आले होते. संजय राऊत गणपतीसाठी माझ्या घरी येतात. तसेच त्यांना जेव्हाही आर्थिक मदत लागली तेव्हा मी त्यांना मैत्रीमध्ये मदत केली आहे. मला ओळखत नसल्याचे ते म्हणाले. त्यांना विसरण्याचा आजार झाला आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या मोठ्या माणसाचा मी काम करणारा जरी बनलो तरी माझ्या नशिबाचा भाग आहे. संजय राऊत तुम्ही उद्धव ठाकरेंचे ब्लू हेड बॉय आहात की शरद पवारांचे. आमची एका व्यक्तीसोबत निष्ठा आहे पण तुमची कोणासोबत आहे?,” असा सवाल मोहित कम्बोज यांनी केला.

“तुम्ही आज जे शक्तीप्रदर्शन केले त्यातून तुम्ही तुमच्यासोबत काही लोक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण जे लोक तुमच्यासोबत होते ते सत्तेत बसलेले नव्हते. जे ताकदवान लोक आहेत त्यांनी तुमच्या आरोपांचे समर्थन केले नाही. तुमचा भ्रष्टाचार उघड झाल्याने तुम्ही खोटी गोष्ट महाराष्ट्रासमोर आणून शक्ती प्रदर्शन केले. विरोधकांना घाम फुटेल असे म्हटला होतात आणि तुम्हालाच घाम फुटला, असे मोहित कम्बोज म्हणाले.

मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो ईडीच्या धाडी पडणार – संजय राऊत

“तुम्ही पत्रकार परिषद घेता तेव्हा अभ्यास करायची गरज असते. राकेश वाधवानकडून मी १२ हजार कोटींची जमीन १०० कोटींना घेतल्याचे तुम्ही म्हटले. १० लाख रुपये स्केअर फूटांची जागा मुंबईतच नाही तर संपूर्ण जगात कुठे आहे का? तुम्ही पण नवाब मलिकांसारखी बारामतीची वनस्पती खाऊन पत्रकार परिषद घेत आहात का? माझ्या कंपनीने गुरु आशिष कंपनीकडून २०१० साली जमिनीची खरेदी केली. मी त्यांना दिलेले पैसे बुडाले. त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने राकेश यांना पुर्नविकासाठी जागा दिली होती आणि आजही तिथे काम झालेले नाही. त्यानंतर २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी गुरु आशिषवर गुन्हा दाखल केला. त्याचा तक्रारदार मी आहे. प्रविण राऊतने संजय राऊतांची मदत घेऊन गुरु आशिषसोबत मिळून घोटाळा केला आणि आम्हा सर्वांना फसवण्यात आले. तुम्ही मी माझ्यासोबतच घोटाळा केला असे म्हणत आहात का? तुम्हाला त्या विषयाची माहिती नसेल तर तुम्ही खोटे आरोप लावणे बंद करा,” असे कम्बोज म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक फ्रंटमॅन आहे मोहित कम्बोज. मोहित कंम्बोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे. पत्राचाळची जमीन खरेदी करणारे मोहित कम्बोज आहेत. त्यामध्येही पीएमसी बॅंकेचे पैसे लावलेले आहेत. पत्राचाळीमध्ये पीएमसी बॅंकेच्या गैरव्यवहारातील पैसे लावण्यात आले आहेत. तिथे मोहित कम्बोजचे एक बांधकाम सुरु आहे आणि आमच्याकडे बोट दाखवले जात आहे. राकेश वाधवानकडून मोहित कम्बोजच्या केबीजी ग्रुपने १२ हजार कोटी रुपयांची जागा फक्त १०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. मोहित कम्बोजच्या कंपन्यांमध्ये पैसा कुठून आला हे देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohit kamboj responds to sanjay raut allegations abn