मुंबई : आर्थिक विवंचनेत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आता जागांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महामंडळाच्या विविध आगारांच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) व्यावसायिक स्वरूपात विकास करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटात असल्याने सरकारच्या मदतीवर कारभार सुरू आहे. यामुळे महामंडळाला आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी आता जागांचे खासगीकरण करण्याचा घाट महामंडळाने घातला आहे. शुक्रवारी याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या वेळी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यासंदर्भात चर्चा झाली. बैठकीस महामंडळाचे सबंधित अधिकारी उपस्थित होते.
महामंडळाच्या विविध शहरांमध्ये जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून या जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा. यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात यावे, अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या.
जागांचे वर्गीकरण
‘एसटी’च्या राज्यातील जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थिती, व्यावसायिक लाभ आदी बाबी लक्षात घेण्यात याव्यात. या जागांच्या विकासासाठी अ, ब आणि क असे वर्गीकरण करून त्यांचे एक ‘पॅकेज’ करावे. ज्यामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण जागांचा समावेश असावा. या कामाला गती देऊन तातडीने या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.