Maharashtra State Road Transport Corporation / मुंबई : गेल्या काही दिवसांत देशातील विविध भागात शयनयान (स्लीपर) बसगाडीला आग लागून ४६ जणांचा मृत्यू झाला. नुकताच आंध्रप्रदेशातील कुर्नूलमध्ये शयनयान बसगाडीला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने ”शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन” अभियान सुरू केले आहे.

शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन या अंतर्गत शयनयान बसमधील प्रवाशांनी स्वतःची व इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक उपाय व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. बसगाडीला आग लागल्यास किंवा अपघात झाल्यास बसमधून सुरक्षित बाहेर पडण्याचे काही निश्चित मार्ग असतात. मात्र त्यांची माहिती नसल्यामुळे अनेकदा जीवितहानी वाढते.

मुख्य दरवाजा नेहमी खुला आणि अडथळामुक्त ठेवावा. आपत्कालीन दरवाजा बसमध्ये असलेला हा मार्ग कधीही अडथळ्यांनी रोखू नये. बसच्या छतावरून बाहेर पडण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन हॅच असतात. आगीच्या प्रसंगी त्याचा वापर करावा. सुरक्षा हातोडी प्रत्येक वातानुकूलित बसच्या खिडकीजवळ असते, काच फोडून बाहेर पडण्यासाठी याचा उपयोग करावा, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

शयनयान बस ही प्रवासासाठी आरामदायी असली तरी, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रवासी स्वतः जागरूक राहिले, तर अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. कुर्नूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेचा उद्देश प्रवाशांमध्ये सुरक्षा सजगता वाढवणे हा आहे. कारण सजग प्रवासीच सुरक्षित प्रवासाची हमी देऊ शकतात, असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

प्रवाशांनी घ्यावयाची काळजी

  • बसमध्ये बसल्यानंतर सर्व बाहेर पडण्याचे मार्ग बघून ठेवणे
  • आपत्कालीन दरवाज्यासमोर सामान ठेवू नये.
  • हातोडीचा वापर आपत्कालीन वेळी करणे
  • संकटाच्या वेळी घाबरू न जाता, स्वतःचा बचाव करणे.
  • कपड्यांना आग लागल्यास पाणी किंवा चादर टाकून आग विझवणे
  • धुराने बस भरल्यास जमिनीच्या जवळून सरकून बाहेर पडावे.
  • कोणत्याही परिस्थितीत सामान वाचवण्याचा प्रयत्न करू नये.
  • बसमध्ये चढल्यानंतर जर धूर, जळक्या विद्युत तारा किंवा चार्जिंग पॉईंट गरम असल्याचे दिसल्यास, त्वरित चालकाशी संपर्क साधा
  • ज्वलनशील पदार्थ, फटाके, पेट्रोलियम पदार्थ घेऊन प्रवास करू नये.
  • आपत्कालीन मदतीसाठी १००, १०८ किंवा स्थानिक अग्निशमन दलाशी संपर्क साधावा.
  • बस सुरू होण्यापूर्वी चालक व वाहक यांनी प्रवाशांना आपत्कालीन मार्गांची माहिती द्यावी.