मुंबई : २० वर्षांच्या गतीमंद मुलीवर १७ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी दक्षिण मुंबई वडिलांसोबत राहते. ती गतीमंद असून तिला ऐकू येत नाही, तसेच नीट बोलताही येत नाही. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखत होते. तिने जवळच राहणाऱ्या आजीला याबाबत सांगितले. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळले. ही बाब रुग्णालयाने पोलिसांना कळवली.

पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्यांनी पीडित मुलीला बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात आली. संस्थेच्या समुपदेशकांनी चित्र आणि बोटांवर बसविण्यात येणाऱ्या बाहुल्यांच्या आधारे मानसोपचारपध्दतीने मुलीला बोलते केले. ५ दिवस समुदपेदशक तिच्याशी संवाद साधत होते. त्यावेळी तिने दोघांची नावे वारंवार घेतली. मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर लैगिक अत्याचार करण्यात येत होता.

दोघांना अटक, १५ जणांच्या रक्ताचे नमुने घेतले

पोलिसांनी याप्रकरणी १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा आणि ३३ वर्षीय तरुणाला अटक केली. या मुलीने अन्य १५ जणांची नावे घेतली आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन डीएनए पडतळणीसाठी पाठविण्यात आले आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमाअंतर्गत बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित मुलगी राहते त्याच परिसरातील हे आरोपी आहेत. मुलगी मनोरुग्ण असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपींने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.