मुंबई : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वांद्रे – कुर्ला संकुल ते शिळफाटादरम्यान २१ किमी लांबीचा बोगदा उभारण्यात येणार आहे. हा बोगदा दोन टप्प्यात उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील २.७ किमी लांबीच्या बोगद्याचे खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) ५०८ किमी लांबीचा मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील वांद्रे – कुर्ला संकुल स्थानक भूमिगत आहे. वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाट्यापर्यंत २१ किमी लांबीचा बोगदा खणण्यासाठी टनेल बोअरिंग यंत्र (टीबीएम) आणि न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. तसेच २१ किमी लांबीच्या बोगद्यातील ठाणे खाडीखालून जाणारा ७ किमी लांबीचा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे.

बोगद्याचे काम कशाप्रकारे सुरू

राज्यात २१ किमी लांबीच्या बोगद्याचे बांधकाम सुरू आहे. हा बोगदा १३.२ मीटर व्यासाचा आहे. त्यामध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्ग बांधण्यात येणार आहेत. प्रकल्पाती हा संपूर्ण भाग अतिशय महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे. एकूण २१ किमी लांबीच्या बोगद्यांपैकी ५ किमी लांबीच्या शिळफाटा ते घणसोलीदरम्यानच्या बोगद्याच्या बांधकामासाठी न्यू ऑस्ट्रियन टनलिंग (एनएटीएम) पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. ९ जुलै २०२५ पर्यंत २.७ किमी लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित १६ किमी लांबीचा बोगदा टनेल बोरिंग यंत्राचा (टीबीएम) वापर करून बांधण्यात येणार आहे.

एकूण २१ किमी पैकी २.७ किमी बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. तर, आता बोगद्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू होईल. त्यानंतर आरसी ट्रॅक बेड टाकले जाईल आणि रेल्वे रूळ बसवण्याचे काम त्वरित सुरू होईल. पावसाळ्यानंतर लगेच महाराष्ट्र विभागात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जलद गतीने आणि नियोजित वेळेनुसार पूर्ण केले जाईल. – विवेक कुमार गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, एनएचएसआरसीएल