नो पार्किंगमध्ये उभी असलेली मित्राची दुचाकी सोडवण्यासाठी आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तोतया अधिकाऱ्याला एल.टी मार्ग पोलिसांनी अटक केली. वाहतुक पोलिसाने सतर्कता दाखवून आरोपीकडे ओळखपत्र मागितले असता त्याने बनावट ओळखपत्र दिल्यामुळे त्यांचे बिंग फुटले.
तक्रारदार पोलीस शिपाई गणेश नागरे कल्याण येथील रहिवासी असून काळबादेवी वाहतुक पोलीस विभागात कार्यरत आहेत. अब्दुल रेहमान मार्ग येथे ते रविवारी कार्यरत होते. त्यावेळी वाहने उभी करण्यास मनाई असलेल्या रस्त्यावर दुचाकी उभी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या दुचाकीवर दंडात्मक कारवाई करताना तेथे एक व्यक्ती आली.

हेही वाचा >>> मुंबई : तीन महिन्यांनंतर जलवाहतूक पूर्ववत ; १ सप्टेंबरपासून गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा, मांडवा बोटसेवा सुरू

मोहम्मद फरहान अस्लम अन्सारी असे नाव सांगून संबंधीत गाडी त्याची असल्याचे त्याने सांगितले. त्यावर नागरे यांनी त्याच्याकडे गाडीची कागदपत्रे मागितली. त्याच्याकडे आर.सी. बुक नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तेथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी (अँटी करप्शन अधिकारी) असल्याचे सांगून आणखी एक व्यक्ती आली. नागरे यांना संशय आल्यामुळे त्यांनी तुमचे कार्यलय कोठे आहे, असे विचारले. त्यावेळी त्या व्यक्तीने रामवाडी येथे असून मुख्य कार्यालय दिल्लीला असल्याचे सांगितले. नागरे यांनी त्याच्याकडे ओळखपत्र मागितले. त्याने नॅशनल अँटी करप्शन ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया असे लिहिलेले ओळखपत्र दाखवले. नागरे यांनी ते ओळखपत्र जप्त करून याबाबतची तक्रार एलटी मार्ग पोलिसांकडे केली. त्यानुसार पोलिसांनी तोतया अधिकारी कमलेश कुमार सोनी याला अटक केली.