मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कितीही विनवण्या केल्या तरी ते इच्छित ठिकाणी येत नाहीत. जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांबरोबर हुज्जत घालणे, जादा भाडे आकारणे यामुळे रिक्षा, टॅक्सीकडे पाठ दाखवत प्रवाशांनी ॲप आधारित वाहतूक सेवेला पसंती देण्यास सुरुवात केली. परंतु, ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांचा संप सुरू झाल्याने प्रवाशांना फटका बसत आहे. त्यामुळे पुन्हा प्रवाशांना रिक्षा, टॅक्सीची वाट पाहत थांबावे लागत आहे.

बेस्ट बसच्या मर्यादित फेऱ्यांमुळे प्रवासी हतबल झाले असून त्यांना प्रवासासाठी पर्यायी मार्ग निवडावा लागत आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांच्या वाईट वर्तणुकीमुळे प्रवाशांना ॲप आधारित वाहतूक सेवेचा आधार होता. परंतु, ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा चालक संपावर गेल्यामुळे प्रवाशांना फटका बसला आहे.

वाहन थांबवून, सेवा बंद करण्याचे आवाहन

मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरात गेल्या दोन दिवसांपासून ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांचा संप सुरू आहे. त्यामुळे ॲप रिक्षा, टॅक्सी सेवा ठप्प झाली आहे. घर बसल्या प्रवासी ॲपवरून वाहनांची निवड करून, ठरवलेल्या दरात इच्छित प्रवास करू शकत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून ॲप आधारित वाहतूक सेवेवरून पटकन गाडी उपलब्ध होत नाही. गाडी उपलब्ध झालीच तर ती विलंबाने येते. ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी रस्त्यावर धावताना दिसल्यास संपात सहभागी चालक या गाड्या थांबवतात.

कायद्याचे भान राखा

ठाण्यात ॲप आधारित वाहन थांबविल्यानंतर प्रवाशांना वाहनांतून उतरविण्यात आले. परंतु, मुंबईत असे प्रकार रोखण्याचे आवाहन महाराष्ट्र कामगार सभा अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले. राज्यभरात सुमारे १८ लाख ॲप आधारित वाहने असून त्या वाहनांवर १८ लाखांहून अधिक जणांचा उदरनिर्वाह चालतो. आपला वाद हा प्रवासी किंवा कोणत्याही चालकांशी नसून ॲप कंपन्यांशी आहे. त्यामुळे प्रवाशांशी वाद घालू नये, अथवा त्यांच्याशी बोलू नये. फक्त वाहन चालकांशी बोलून त्याला संपात सहभागी होण्याची विनंती करावी, असे आवाहन डॉ. केश क्षीरसागर यांनी केले.

ॲप आधारित रिक्षा, टॅक्सीमधून प्रवास करताना प्रवासाचे भाडे ॲपवर दाखविण्यात येते. मात्र प्रवास संपल्यानंतर त्याहीपेक्षा अधिक भाडे ॲपवर दाखविले जाते. त्यामुळे प्रवाशांची लूट होते. गेल्या दोन दिवसांपासून ॲपद्वारे रिक्षा, टॅक्सी मिळत नसल्याने पर्यायी वाहतूक सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. – मनोज पाटील, धारावी

दररोज ॲप आधारित वाहतूक सेवेचा वापर करत असल्याने, या सेवेची सवय झाली आहे. परंतु, आता गेल्या दोन दिवसांपासून ॲप प्रवास आरक्षित होतो. परंतु, रिक्षा, टॅक्सी वेळेवर येत नाही. त्यामुळे प्रवास करताना प्रचंड हाल होत आहेत. – रोहित कदम, कुर्ला