जे.जे. मार्ग परिसरात भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने पोलिसाला धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेनंतर दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पलायन केले असून या अपघातात पोलीस गंभीर जखमी झाला आहे. जखमी पोलिसाच्या तक्रारीवरून जे. जे. मार्ग पोलिसांनी अनोळखी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. सीसी टीव्ही कॅमेराच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठाच्या पेटसाठी साडेचार हजार अर्ज २६ आणि २७ ऑगस्ट रोजी

पोलीस शिपाई गणेश दगडू जाधव (३७) सोमवारी जे. जे. परिसरातील नेसबिट जंक्शन येथे कर्तव्यावर होते. जे. जे. जंक्शन परिसरातील अल्माल हॉटेल येथे ते सोमवारी रात्री चहा पिण्यासाठी आले होते. तेथून नेसबिट जंक्शन येथे परतत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघात ते जखमी झाले. त्यांचा डावा पाय आणि व हाताला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार पाहून दुचाकीस्वाराने दुचाकीसह तेथून पलायन केले. त्यानंतर पादचारी व सहकारी पोलिसांनी जाधव यांना रुग्णालयात नेले. तपासणीत त्यांच्या डाव्या पायाला गुडघ्याजवळ व डाव्या हाताला अस्थिभंग (फ्रॅक्चर) आहे. जाधव यांना उपचारासाठी वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जाधव यांना जखमी करून कोणतीही वैद्यकीय मदत न केल्याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.