मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील वादग्रस्त सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसित इमारतींची कामे पूर्ण झाली असून या इमारतींना नुकताच निवासी दाखलाही (ओसी) मिळाला आहे. लवकरच या इमारतीतील ६२९ घरांचे मूळ भाडेकरूंना वितरण करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या पुनर्वसित इमारतीमधील ६५० चौरस फुटांची, अडीच बीएचकेची अतिरिक्त १४ घरे सर्वसमामान्यांना सोडतीद्वारे उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. या घरांचा समावेश २०२५ मधील आगामी सोडतीत करण्यात येणार आहे. त्याचवेळी या घरांची विक्री बाजारभावाने वा रेडीरेकनरऐवजी म्हाडाच्या सोडतीतील किंमतीच्या धोरणानुसार अर्थात परवडणाऱ्या दरात केली जाण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्राचाळीचा प्रकल्प वादात अडकल्यानंतर विकासकाविरोधात कठोर कारवाई करून हा प्रकल्प राज्य सरकारने मुंबई मंडळाच्या ताब्यात दिला. हा प्रकल्प २०१८ मध्ये मंडळाच्या ताब्यात आला. मंडळाने हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करून २०२२ मध्ये अर्धवट अवस्थेतील पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाला सुरुवात केली. आर ९ भूखंडावरील १७४६३.३० चौरस मीटर जागेवरील १२ मजल्यांच्या एकूण १६ इमारती उभ्या करण्याचे आव्हान मंडळासमोर होते. त्यानुसार डिसेंबर २०२४ अखेर पुनर्वसित इमारतींची कामे पूर्ण करण्यात आली. जानेवारी २०२५ मध्ये या इमारतींना निवासी दाखला मिळाला. त्यामुळे आता या इमारतीतील पात्र मूळ ६२९ भाडेकरूंना लवकरच घरांचा ताबा देण्यात येणार आहे. दरम्यान, या पुनर्वसित इमारतीत मूळ आराखड्यानुसार एकूण ६८६ घरे बांधण्यात आली आहेत. यापैकी ६७२ घरे मूळ भाडेकरूंसाठी आहेत. तर उर्वरित १४ घरे मुंबई मंडळाला प्राप्त झाली आहेत. ही अतिरिक्त १४ घरे आगामी सोडतीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

पुनर्वसित इमारतीतील ही ६५० चौरस फुटांची, अडीच बीएचकेची १४ घरे आहेत. तर ११७ चौरस फुटांचे क्षेत्र बाल्कनीच्या रुपात देण्यात आले आहे. या प्रकल्पात दोन समाज मंदिर, एक उद्यान, खेळाचे मैदान, प्रत्येक सदनिकेमागे एक वाहनतळाची जागा, ध्यानधारणा केंद्र, व्यायामशाळा आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुनर्वसित इमारतीत ६५० चौरस फुटांचे घर घेण्याची संधी इच्छुकांना लवकरच सोडतीच्या रुपाने उपलब्ध होणार आहे. दिवाळीदरम्यान वा वर्षाअखेरीस मुंबईतील घरांसाठी सोडत काढण्याचे मंडळाचे नियोजन आहे. या सोडतीत ही १४ घरे समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही बोरीकर यांनी सांगितले.

पत्राचाळ पुनर्वसित इमारतीतील अतिरिक्त १४ घरे बाजारभावाने वा रेडीरेकनरने विकण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. रेडीरेकनर वा बाजारभावाने या घरांची विक्री झाली तर त्यांच्या किंमती भरमसाठ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेडीरेकनर वा बाजारभावाऐवजी म्हाडाच्या सोडतीतील किमतीच्या धोरणानुसार परवडणाऱ्या दरात या घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai board decides to make 14 houses in the rehabilitated building in patra chal available to the general public through lottery mumbai print news amy