मुंबई : हवामान विभागाने सोमवारपाठोपाठ मंगळवारीही वर्तवलेल्या इशाऱ्यानुसार पावसाने महामुंबईत दमदार वर्षाव केला. पावसाची दिवसभर संततधार सुरूच राहिल्याने मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकलसेवा पूर्णत: ठप्प झाली. मुसळधार पाऊस, रुळांवर साचलेले पाणी आणि कमी दृष्यमानता यामुळे मध्य रेल्वेवरील गाड्यांची सेवा थांबवण्यात आली होती. दरम्यान, सीएसएमटी आणि ठाणे दरम्यानची ठप्प झालेली उपनगरी लोकल सेवा ८ तासांनी सुरळीत झाली. तत्पूर्वी सोमवारच्या पावसाने बहुतांश प्रवाशांनी मंगळवारी घरी राहणेच पसंत केले. त्यातच शासनाने सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे तुलनेने गर्दी कमी होती.
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते ठाणे दरम्यान मुख्य मार्गावरील अप व डाउन जलद आणि धीम्या मार्गावरील उपनगरी रेल्वे सेवा अनुक्रमे सकाळी साडेअकरापासून बंद होत्या. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यानची उपनगरी रेल्वे सेवाही सकाळी ११ वाजून २० मिनिटांपासून स्थगित करण्यात आली होती. या काळात मुख्य मार्गावरील ठाणे ते कसारा, कर्जत, हार्बर मार्गावरील पनवेल ते मानखुर्द आणि ट्रान्स-हार्बरवरील ठाणे ते वाशी दरम्यान उपनगरी सेवा सुरू होत्या. तसेच नेरुळ बेलापूर ते उरण दरम्यानच्या उपनगरी रेल्वेसेवाही सुरू होत्या.
मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकात मंगळवार सकाळपासून पाणी साचल्याने लोकल सेवा सुमारे अर्धातास उशिराने धावत होत्या. मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सीएसएमटी, ठाणे, मानखुर्द लोकल सेवा बंद करण्यात आली. कुर्ला, सायन, मानखुर्द, गोवंडी आदी स्थानकांत रुळांवर १६ ते १७ इंच पाणी भरले होते. सकाळी सायन आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान लोकल खोळंबल्या होत्या. त्यानंतरही मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक उशिराने धावत होत्या.
रेल्वे वाहतूक दिवसभरात
– सीएसएमटी-ठाणे लोकल वाहतूक बंद, परंतु ठाणे, कल्याण, कसारा-कर्जत लोकल सेवा ‘शटल’ स्वरूपात सुरू होत्या.
– सीएमएमटी येथून ठाण्याकडे जाणारी पहिली लोकल सायंकाळी ७ वाजून २८ वाजता सोडण्यात आली.
– सीएसएमटी ते वांद्रे /गोरेगाव दरम्यानची उपनगरी रेल्वे सेवा दुपारी १ वाजून ३० वाजता पुन्हा सुरू झाली.
– कुर्ला स्थानकातील पाणी ओसरल्यानंतर रात्री ८ वाजून ३६ मिनिटांनी कुर्ला स्थानकातून सीएसएमटीकडे लोकल रवाना.
– रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी कुर्ला स्थानकातून पनवेलच्या दिशेने विशेष लोकल रवाना करण्यात आली.
– हार्बर मार्गावरील कुर्ला ते पनवेल ट्रेन रात्री साडेनऊ वाजता सुरू झाली.
– पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा सुरू असल्या तरी त्या दिवसभर १५ ते २० मिनिटे उशीराने धावत होत्या.
– मध्य रेल्वेवर लांब पल्ल्याच्या ७ गाड्या दिवसभरात रद्द करण्यात आल्या, तर १६ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले.
– पाच रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. यापैकी ३ रेल्वे पुणे स्थानक, ३ पनवेल, १ नाशिक स्थानकातून सोडण्यात आल्या.
रस्ते वाहतुकीवर परिणाम
– मुंबईत सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्र नगर सबवे, अँटॉप हील आदी ठिकाणी, तसेच एमजी आर चौक, कानेकर नगर, सरदार नगर, प्रतीक्षा नगर आदी भागांत दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले. वडाळा बीपीटी कॉटन फाटक येथेही दोन फूट तर पेडर रोड, ताडदेव महालक्ष्मी मंदिर परिसरात दीड फूट पाणी साचले होते. काळबादेवी अलंकार जकंस्शन येथेही पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. मालाड सब वे गोरेगाव येथे दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने त्या ठिकाणची वाहतूक ‘एमटीएनएल जंक्शन’मार्गे वळवण्यात आली. माटुंगा येथील गांधी मार्केट परिसरात दीड फूट पाणी साचले होते, हिंदमाता येथे वाहतूक संथ गतीने सुरू होती.
– पश्चिम उपनगरातील अंधेरी बर्फीवाला रोड, डी .एन. रोड, खार सब वे, अंधेरी सब वे बंद पाणी साचल्यामुळे बंद करण्यात आला होता. तेथील वाहतूक इतर ठिकाणी वळवण्यात आली होती. या शिवाय मालाड सब वे, समता नगर पोईसर सब वे येथेही पाणी साचल्याने आरे कार शेड रोडवर मरोळ युनिट क्र. १९ (दिंडोशी) कडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती. पश्चिम द्रुतगती मार्ग व पूर्व मुक्त मार्ग येथील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. ठिकठिकाणी वाहने बंद पडल्यामुळेही वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.