सण, उत्सव असो किंवा कौटुंबीक कार्यक्रम, महाराष्ट्र पोलीस नेहमीच आपल्या कर्तव्याला प्राधान्य देतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न सोडून एक पोलीस अधिकारी चक्क बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळालं. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून चक्क मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आहेत. या कृतीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होतो आहे.
शनिवारी महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्च्यात महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. या मोर्च्यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे सुद्धा एकुलत्या एक मुलीचा विवाह सोहळा असताना बंदोबस्तात हजर होते.
हेही वाचा – Love Jihad: “पाच वर्षांपूर्वी माझा विश्वास नव्हता, पण आता…”, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीचा मोर्चा आणि मुलीचे लग्न एकाच दिवशी आल्याने विवेक फणसळकर यांच्यासाठी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. अशातच त्यांनी मुलीच्या लग्नापेक्षा आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. घरात सनईचौघडे सुरू असताना पोलीस आयुक्त फणसळकर सकाळपासूनच मोर्चास्थळी पाहायला मिळाले. दरम्यान, ही बाब समोर येताच आता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
हेही वाचा – “शिवभक्त आहेस ना, मग महाराजांच्या काळात स्त्रियांचा बाजार…”; संभाजीराजेंचं सुबोध भावेला जाहीर आव्हान
विवेक फणसळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्त होण्यापूर्वी ते ठाणे शहराचे पोलीस आयुक्त होते. तसेच त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातही काम केले. याचबरोबर ते अतिरिक्त महासंचालक आणि महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एडीजीसुद्धा राहिले आहेत.
